‘सोशल’ तरुणाई!
By Admin | Published: January 12, 2017 05:43 AM2017-01-12T05:43:13+5:302017-01-12T05:43:13+5:30
गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र विस्तारत चालले आहे. त्यामुळेच मग हल्ली तरुण पिढी केवळ ‘स्मार्ट फोन्स’मध्ये
गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र विस्तारत चालले आहे. त्यामुळेच मग हल्ली तरुण पिढी केवळ ‘स्मार्ट फोन्स’मध्ये डोक खुपसून असल्याची ओरड होते आहे. या स्मार्ट फोन्सच्या जमान्यात तरुणाईपासून वाचनसंस्कृती दुरावली, नात्यातील जिव्हाळा संपला आणि केवळ ‘टेक्नोलॉजी’च्या असंवेदनशील जगात तरुणाई वावरत असल्याची टीका कायम होते. मात्र, याच तंत्रज्ञानाच्या जगात संवेदनशीलता आणि सामाजिक ऋण जपत असलेले ‘सोशल यंगस्टर्स’ आजच्या पिढीसाठी ‘आयडॉल’ ठरत आहेत. यशाच्या मागे धावत असलेल्या तरुणाईला सामाजिक जाणिवाही जपल्या पाहिजेत, अशी काहीशी शिकवण देणारे हे यंगस्टर्स आपल्या कार्यातून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. अशाच काही तरुण-तरुणींचा प्रवास... संकलन : स्नेहा मोरे
अनाथांचा ‘पालक’
आष्टी तालुक्यातील पाटसरचा रहिवासी असणारा संतोष गर्जे याने घरची हालाखीची परिस्थिती असूनही विज्ञान शाखेतील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, औरंगाबाद येथे नोकरी करत असताना सामाजिक काम करण्याची इच्छा प्रबळ झाली. मग एका पत्र्यावाल्याच्या दुकानातून उधारीवर पत्रे घेऊन घर उभारले. त्यानंतर, अनाथ मुलांच्या शोधात निघाला. ४-५ दिवसांतच सात अनाथ मुले सापडली. त्याने त्यांना थेट घरी आणून त्यांचा सांभाळ करण्यास सुरुवात केली. याचेच प्रतिबिंब म्हणजे आजच्या घडीला समाजातील ८५ अनाथ लहानग्यांचा सांभाळ संतोष २००४ सालापासून करीत आहे. गेवराईपासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत ‘बालग्राम’ हे अनाथालय विसावले आहे. २००७ मध्ये संस्थेचे नोंदणीकरण करून, ‘आई’या संस्थेचा पाया रचला. या अनाथालयात आता बीड, पंढरपूर, जालना, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर या भागांतील तीन ते २५ वयोगटातील अनाथ मुले-मुली आहेत. याविषयी संतोष सांगतो की, पाच विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी आहेत. भविष्यात या निराधार विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा संतोषचा मानस आहे.
दृष्टिहीन ‘स्वराधार’
लोकलमध्ये गाणी गाणाऱ्या व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बऱ्याचदा वेगळा असतो. मात्र, याच व्यक्तींचे ‘सूर’ हेरून मुंबईच्या हेमलता तिवारी या तरुणीने ‘स्वराधार’ला जन्म दिला. २०१० साली महाराष्ट्र दिनी लोकलमध्ये प्रवास करताना दोन दृष्टिहिन व्यक्तींना गाताना पाहिले आणि त्यांचे गाणे ऐकून त्यांच्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याची धडपड सुरू झाली. या प्रवासाविषयी हेमलता सांगते की, ‘स्वराधार’तर्फे दर रविवारी तीन तास अशा व्यक्तींना गाणे किंवा वाद्य वादनाचे प्रशिक्षिण दिले जाते. ट्रेनिंग देणारे हे प्रशिक्षित संगीतकार असतात. ते समाजसेवेचा भाग म्हणून स्वराधारशी जोडले गेलेत. अशा प्रकारे आतापर्यंत २०० हून अधिक जणांना स्वराधारमधून मोफत संगीताचे प्रशिक्षण दिल्याचे तिने सांगितले. हेमलता २१ वर्षांची असताना तिने ‘स्वराधार’ सुरू केले, त्यासाठी खासगी शाळेतील नोकरीही सोडली. स्पर्धेच्या या वेगवान जगात उचललेल्या हे पाऊल धाडसी होते खरे, पण दुसऱ्याला आनंदी बघण्यातच खूप समाधान मिळते, असे हेमलता अभिमानाने सांगते. स्वराधारबरोबर आता अनेक तरुण-तरुणी जोडले गेलेत.
मनोरुग्णांची ‘सेवक’
अमरावतीच्या गुंजन गोळे हिने मनोरुग्णांची सेवा करण्याचे कार्य होती घेतले आहे. रस्त्यावर हिंडणाऱ्या रोगी, मनोरुग्ण, कुष्ठरोगी व्यक्तींना ती मदत करते आहे. या प्रवासाची सुरुवात करताना बऱ्याच अडथळ््यांना तिला तोंड द्यावे लागले. या प्रवासातील कठीण अनुभवांविषयी गुंजन सांगते की, काही वेळा मनोरुग्णांना मदत करताना ते घाबरून दगडही मारायचे, पण मग भाषा, धर्म, जात या पलीकडे जाऊन त्यांना प्रेम, आपुलकीने समजाविले आणि समजून घेतले, त्यानंतर या प्रवासाला वेगळी दिशा मिळाली. आता घरातून कधीही बाहेर पडताना जवळ खाऊ, पाणी आणि फळे असतात. सध्या अमरावती बसस्थानक परिसरातील १० निराधार वयोवृद्धांना रोजचे एक वेळचे जेवण देते. भविष्यात अमरावतीमध्ये एकाही निराधाराला उपाशी राहू न देण्याचा निर्धार गुंजनने केला आहे. राज्यात प्रथमच महिला ढोल पथक सुरू करण्याचा मान गुंजनने पटकाविला आहे. ‘गावीलगड’ ढोलपथक अमरावतीसह राज्यभर गाजते आहे. ढोलपथकाच्या माध्यमातून येणारा पैसा ती सर्व मनोरुग्णांच्या सेवेसाठी, अनाथ बालकांसाठी, तसेच निराधार वयोवृद्धांच्या सेवेवर खर्च करते.