‘एकमेका साहाय्य करू’चा संदेश देणारी सोसायटी

By admin | Published: February 26, 2016 04:08 AM2016-02-26T04:08:57+5:302016-02-26T04:08:57+5:30

‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ याचा अर्थ जाणून घेत, एकमेकांसाठी अगदी कोणत्याही क्षणी धावून येण्याची तयारी दाखवणारे अपूर्व सिद्धी को-आॅप. हौ. सोसायटी एक कुटुंब आहे.

Society giving message to 'help one another' | ‘एकमेका साहाय्य करू’चा संदेश देणारी सोसायटी

‘एकमेका साहाय्य करू’चा संदेश देणारी सोसायटी

Next

- लीनल गावडे,  मुंबई
‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ याचा अर्थ जाणून घेत, एकमेकांसाठी अगदी कोणत्याही क्षणी धावून येण्याची तयारी दाखवणारे अपूर्व सिद्धी को-आॅप. हौ. सोसायटी एक कुटुंब आहे. १९७६ पासून वसलेल्या या कुटुंबातील ‘एकजूट’ अगदी अजूनही तशीच टवटवीत आहे.
विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर १ येथील, इमारत क्रमांक २०२ मध्ये दोन विंगची अपूर्व सिद्धी सहकारी गृहनिर्माण संस्था ही सोसायटी आहे. १९७६ सालापासून येथील रहिवाशांचा एकमेकांशी ऋणानुबंध आहे. कॉमन गॅलरी असलेली ही इमारत जुन्या बैठ्या चाळींप्रमाणेच वाटते. मात्र, इमारतीचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असतो. आधुनिक सुविधा नसल्या, तरी येथील रहिवाशांमुळे इमारत स्वत:चे वेगळेपण सिद्ध करते. वैचारिक मतभेद असले, तरी वैयक्तिक सलोखा कायम असतो. परिणामी, याच स्वभावामुळे रहिवाशांतील गोडवा आजतागायत टिकून आहे, असे सोसायटीचे सचिव सतीश मोरे आवर्जून सांगतात.
मराठी भाषिकांसोबतच गुजराती, मुस्लीम, ख्रिश्चन धर्माचे लोकही या ठिकाणी राहतात, पण एकमेकांच्या सणात ते मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. सोसायटीत अगदी कोणाच्याही घरी मंगलकार्य असो, आपले घर आपले कुटुंब समजून सारेच सहभागी होत कामाचा भार उचलतात. एखाद्या रहिवाशाला वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास, सेवा करण्यासाठीही सोसायटी तत्पर असते. या छोटेखानी सोसायटीतील कुटुंबात प्रत्येक पालकाला आपले मूल सुरक्षित आहे, असेच वाटते. सोसायटीच्या महिला सांगतात की, सोसायटीमधील बहुतेक महिला नोकरी करतात. त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवण्याशिवाय गत्यंतर नसते. मात्र, या सोसायटीत मुलांना अगदी निश्चिंत घरी सोडून महिला कामावर जातात. कारण घरी असलेले रहिवाशीच पालकांच्या गैरहजेरीत घरी एकट्या असलेल्या मुलांचे पालक होतात.
विद्यार्थ्यांनी शिकावे, मोठे व्हावे, अशी येथील रहिवाशांची तळमळ असल्याने, सोसायटी विद्यार्थ्यांसाठी करिअर संदर्भातील योग्य मार्गदर्शन देण्याचे काम करते. सोसायटीत प्रत्येक पाल्यावर येथील रहिवाशांचे लक्ष असते. म्हणूनच सोसायटीतील एकाही मुलाला वाईट संगत किंवा व्यसन नाही. वर्षभर सोसायटीत विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.
विशेष म्हणजे, येथील तरुण पुढाकार घेत कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यात वर्षातून एकदा सोसायटीची हमखास सहल निघते. यात रहिवासी धम्माल, मस्ती करतात. सहकारी गृहनिर्माण संस्था नेमकी कशी असावी, याचा वस्तूपाठच या सोसायटीने शहरातील सर्वांसमोर ठेवला आहे.

एकमेकांचे मार्गदर्शक
शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेत, सोसायटीतील प्रत्येक विद्यार्थ्याची अडीअडचणी समजून घेत, त्यांना मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन अन्य कोणी नाही, तर सोसायटीतील दादा, ताईच आपल्याहून लहान मुलांना करतात. त्यामुळे येथील मुलांना शैक्षणिक सल्ला घेण्यासाठी बाहेर जावे लागत नाही.

महिला व मुलांच्या कलागुणांना वाव
केवळ ‘करिअर एके करिअर’ असा तगादा न लावता, विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांनाही जोपासता यावे, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे, स्पर्धांच्या आयोजनात मुलेच पुढाकार घेतात, तर महिलांमध्ये दडलेल्या कलागुणांना बाहेर काढण्यासाठी पाककला, रांगोळी यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्पर्धांमध्ये बक्षिसांहून अधिक सहभागी झाल्याचा आनंद अनेकींना असतो.

‘स्वच्छतेचा वसा’
सोसायटी ४० वर्षे जुनी असली, तरी तिची योग्य ती देखभाल केली जाते. सोसायटीचे आवार नेहमीच स्वच्छ आणि सुंदर असतो. स्वच्छतेला महत्त्व देत, सुट्टीच्या दिवशी सोसायटीतील परिसर सारे एकत्र येऊन स्वच्छ करतात. पूर्व द्रुतगती महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही इमारत असली, तरी शांत आणि हिरवीगार भासते. सोसायटीत ठिकठिकाणी झाडे लावण्यात आली आहे.

सणांचा उत्साह
सणांच्या दिवसात येथील वातावरण औरच असते. होळी, गणेशोत्सव, दहीहंडी, दसरा, दिवाळी या सणांच्या दिवशी सोसायटी रोशणाईपेक्षा आपुलकीने उजळून निघालेली असते. शिवाय वाढते प्रदूषण लक्षात घेत, फटाक्यांऐवजी वेगळ्या पद्धतीने सण साजरे केले जातात.

Web Title: Society giving message to 'help one another'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.