नावीन्यतेतून प्रगतीकडे जाणारी ‘साफल्य’ सोसायटी
By Admin | Published: August 12, 2016 02:43 AM2016-08-12T02:43:46+5:302016-08-12T02:43:46+5:30
नावीन्यता, विविधता आणि एकता या सूत्रात बांधलेली साफल्य ही चांदिवलीतील उत्तम सोसायटी म्हणून ओळखली जाते. १९९५ पासूनचे हे म्हाडा कॉलनीतील कुटुंब
लीनल गावडे, मुंबई
नावीन्यता, विविधता आणि एकता या सूत्रात बांधलेली साफल्य ही चांदिवलीतील उत्तम सोसायटी म्हणून ओळखली जाते. १९९५ पासूनचे हे म्हाडा कॉलनीतील कुटुंब असून अनेक नव्या उपक्रमांमुळे या सोसायटीचे कौतुक आसपासच्या विभागातील रहिवासीदेखील आवर्जून करतात.
चांदिवली येथील म्हाडा वसाहत इमारत क्रमांक ११ येथे साफल्य सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित आहे. या सोसायटीत चार मजली तीन इमारती असून एकूण ११७ कुटुंबे येथे गुण्यागोविंदाने राहतात. अत्यल्प गटात मोडणाऱ्या या इमारतीत कमीत कमी देखभालीचा खर्च घेऊन एकापेक्षा एक सरस असे उपक्रम राबविले जातात. त्यामुळेच सोसायटीने आजतागायत उत्तम सोसायटीचा मान टिकवून ठेवला आहे. म्हाडा कॉलनीतील आदर्श आणि उत्तम सोसायटी म्हणून साफल्य ओळखली जाते.
सोसायटीविषयी सचिव संतोष नागेकर सांगतात की, सोसायटी एक छोटेखानी कुटुंब आहे. येथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव बाळगला जात नाही. त्यामुळेच सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्व कुटुंबे मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. सोसायटीत दहीहंडी, नवरात्रौत्सव, गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी, स्वातंत्र्यदिन, मोहरम, नाताळ, बकरी ईद असे विविध सण वर्षभर साजरे केले जातात. विशेष म्हणजे हिंदू सणांसोबतच अन्य जाती-धर्मांचे सणही त्याच जल्लोषात साजरे केले जातात. या सणांसाठीची सजावटदेखील सोसायटीतील रहिवासी करतात. बाहेरील रेडिमेड वस्तूंपासून सजावट करण्यापेक्षा मुलांना हाताशी घेऊन सजावट केली जाते.
मे महिन्यात पाणीकपात करण्यात आली होती. पण याची झळ साफल्य सोसायटीला बसली नाही. कारण पाणीबचतीसाठी आधीपासूनच सोसायटी जागरूक आहे. कमीतकमी पाण्याचा वापर करण्याची सवय लागल्यामुळे मे महिन्यातही सोसायटीला पुरेल इतके पाणी होते, असे रहिवासी अभिमानाने सांगतात.
पाककलेची लज्जत : सोसायटीतील महिलांसाठी दरवर्षी भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सोसायटीतील महिला मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. स्पर्धांचे परीक्षण अनेक आंतरराष्ट्रीय शेफकडून करण्यात येते.
कार्यक्रमांची रेलचेल : सोसायटीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांत ३ वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंत सारेच जण सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटतात.
स्वच्छतेचा वसा : म्हाडा कॉलनीतील टापटिप आणि स्वच्छ सोसायटी म्हणून साफल्य सोसायटी ओळखली जाते. येथील रहिवाशांनी सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवला आहे. दरदिवशी येथे झाडलोट करण्यात येते. शिवाय डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरू नयेत म्हणून औषध फवारणी आवर्जून करण्यात येते.