सोसायटीतील झाडांची छाटणी आता मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 04:20 AM2017-08-13T04:20:33+5:302017-08-13T04:21:02+5:30
धोकादायक फांद्या कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली आहे. खासगी निवासी जागांवरील झाडांच्या फांद्या आणि झाडे कापण्याचे काम मोफत करण्याची
मुंबई : धोकादायक फांद्या कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली आहे. खासगी निवासी जागांवरील झाडांच्या फांद्या आणि झाडे कापण्याचे काम मोफत करण्याची ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार वसाहती, जुन्या चाळी आणि व्यावसायिक बांधकामांवरील झाडांच्या धोकादायक ठरणाºया फांद्या विनामूल्य तोडून देण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे.
पावसाळ्यापूर्व सर्वेक्षणात धोकादायक ठरलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात येतात. गतवर्षी साडेतीनशे झाडे अतिधोकादायक असल्याचे आढळले होते. मात्र या झाडांच्या धोकादायक फांद्या तोडूनही त्यांचा धोका पालिकेला कमी करता आला नाही. चेंबूरच्या दुर्घटनेतील महिलेच्या मृत्यूने मुंबईला पुन्हा या धोक्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे मृत्यूचा सापळा ठरणारी ही झाडे मोफत तोडून द्यावी, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे. ठेकेदार अवाजवी रक्कम वसूल करतात. त्यामुळे ही झाडे तोडण्यात दिरंगाई होते. यावर तोडगा म्हणून खासगी निवासी जागांवरील झाडांच्या फांद्या कापण्याची कामे मोफत करावीत, ही शिवसेनेचे आशिष चेंबूरकर यांची ठरावाची सूचना महासभेत एकमताने मंजूर करण्यात आली.
ठेकेदारांना चाप
महापालिकेने नेमलेले ठेकेदार मुंबईकरांकडून अवाजवी दर वसूल करतात. या कामासाठी ठेकेदारांकडून अनेकवेळा टाळाटाळ करण्यात येते. जादा पैसे न दिल्यामुळे ही कामे
पूर्ण केली जात नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडतात. मात्र या प्रस्तावाच्या मंजुरीमुळे ठेकेदारांच्या मुजोरीला चाप बसेल, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार, २०१० ते २०१६ या पाच वर्षांत तब्बल ८,३६७ झाडे पडली आहेत. तर जून २०१७पासून आतापर्यंत सुमारे ६०० झाडे पडली आहेत.