समाजाप्रति संवेदनशीलता ही देशभक्ती
By admin | Published: March 15, 2016 02:07 AM2016-03-15T02:07:03+5:302016-03-15T02:07:03+5:30
असहिष्णुतेच्या मुद्यावरील विधानामुळे वादात सापडलेला बॉलीवूड स्टार आमीर खान याने सोमवारी समाजाप्रति संवेदनशीलता आणि हृदयात प्रेम म्हणजे देशभक्ती होय
मुंबई : असहिष्णुतेच्या मुद्यावरील विधानामुळे वादात सापडलेला बॉलीवूड स्टार आमीर खान याने सोमवारी समाजाप्रति संवेदनशीलता आणि हृदयात प्रेम म्हणजे देशभक्ती होय, अशा शब्दांत देशभक्तीचे महत्त्व विषद केले.
आमीर खान याचा सोमवारी ५१ वा वाढदिवस होता. तो म्हणाला की, देशभक्तीचा अर्थ समाज आणि नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी त्यांची मदत करणे. देशभक्तीसाठी आपल्या हृदयात प्रेम असायला हवे. समाज आणि नागरिकांबाबत संवेदनशीलता असायला हवी. माझ्यासाठी हीच देशभक्ती आहे. वाढत्या असहिष्णुतेच्या आमीरच्या विधानावर पडसाद उमटले होते. आमीर म्हणाला की, प्रेक्षकांशी माझे २७ वर्षांपासून नाते आहेत. तर जे लोक माझ्याबाबत प्रश्न उपस्थित करतात ते माझ्याविरुद्ध पूर्वग्रहदूषित आहेत. मी नकारात्मकतेपासून दूर राहतो अन् सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रीत करतो. लोक आपल्याबाबत प्रश्न उपस्थित करतच असतात. संशय घेतच असतात. तरीही आपण नकारात्मक होऊ नये. (प्रतिनिधी)
ेसकारात्मकतेकडे लक्ष द्यावे
आपल्याला याचे भान असायला हवे की, आपण काय करत आहोत. आपली सकारात्मकता आणि आपल्याप्रति लोकांची असलेली सकारात्मकता यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. मला असे वाटते की, बहुतांश लोक सकारात्मक आहेत.
पण, नकारात्मक लोक खूप मोठ्याने ओरडतात. त्यामुळे आम्हाला असे वाटते की, त्यांची संख्या मोठी आहे, असेही आमीर म्हणाला. राज्यातील पाणी टंचाई पाहता यंदा होळीच्या सणाला कोरडे रंग वापरण्याचे आवाहनही आमीरने केले आहे.