चिमुकले ठरताहेत ‘सॉफ्ट टार्गेट’

By admin | Published: January 13, 2016 02:57 AM2016-01-13T02:57:43+5:302016-01-13T02:57:43+5:30

दादरच्या नामांकित शाळेत विद्यार्थिनीवर जो लैंगिक अत्याचार झाला, त्याने शाळा प्रशासन, या वयोगटातील मुलांचे पालक, पोलीस दल सारेच हादरले, पण ही काही एकमेव घटना नाही.

Soft Targets | चिमुकले ठरताहेत ‘सॉफ्ट टार्गेट’

चिमुकले ठरताहेत ‘सॉफ्ट टार्गेट’

Next

- मनीषा म्हात्रे,  मुंबई
दादरच्या नामांकित शाळेत विद्यार्थिनीवर जो लैंगिक अत्याचार झाला, त्याने शाळा प्रशासन, या वयोगटातील मुलांचे पालक, पोलीस दल सारेच हादरले, पण ही काही एकमेव घटना नाही. दिवसाकाठी शहरात अनेक अल्पवयीन मुले पाशवी प्रवृत्तींना बळी पडतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी खास खबरदारी घेणे अत्यावश्यक ठरत आहे.
खाऊच्या आमिषाने सर्वाधिक बळी...
घराबाहेर खेळणाऱ्या, अवेळी वस्तू खरेदीसाठी बाहेर पडलेल्या, शाळा शिकवणीतून घरी परतणाऱ्या लहान मुलांना विविध आमिषे दाखवून आरोपी जाळ्यात ओढतात. चॉकलेट, आइसक्रीम किंवा खाऊच्या आमिषाने सर्वाधिक मुले गुन्हेगारांच्या तावडीत सापडतात.
२०१५ मुलांसाठी ठरले धोकादायक
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या वर्षभरात ४४७ अल्पवयीन मुली नराधमांच्या वासनेच्या बळी ठरल्या, तर ९२२ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. त्यातील ४०० मुली अद्याप बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या आकडेवारीतून उघड झाली आहे. शहरातील चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर अशा झोपडपट्टी विभागातील लहान मुलांवर अत्याचारांचे प्रमाण अधिक दिसून येते. २०१४च्या तुलनेत यामध्ये तिपटीने वाढ झाली आहे.

मुंबई शहरात दिवसाला सरासरी दोन-तीन मुले बेपत्ता होतात. यातली साधारण १४ ते १८ वर्षे वयोगटातली मुले आपल्या मर्जीने घर सोडतात. काही प्रेमप्रकरणातून पळून जातात. काहींचे खंडणीसाठी अपहरण होते. काही मुलं न होणाऱ्या दाम्पत्यांना अवैधपणे विकण्यात येतात. काही परदेशात धाडली जातात. काहींना भीक मागायला भाग पाडले जाते. अजाणत्या वयातली ही मुले गुन्हेगारी प्रवृत्तींसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत.

सर्वाधिक अत्याचार जवळच्या व्यक्तींकडून !
धावपळीच्या जीवनात पालक आणि मुलांमध्ये संवाद हरवत चालला आहे. त्यात या मुलांना चुकीच्या स्पर्शाची जाणीव नसते. अनेकदा अत्याचार हे जवळच्या व्यक्तींकडून होत असल्याने याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवून ‘चांगल्या-वाईट’ स्पर्शाबाबत, संभाव्य धोक्यांबाबत माहिती द्यावी.
- डॉ. सागर मुदंडा, मानसोपचार तज्ज्ञ

पालकांनी सतर्क व्हावे़़़
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस नेहमीच कार्यरत असतात. तथापि, त्यांच्या सुरक्षेसाठी पालकांनीही सतर्क राहणे तितकेचे गरजेचे आहे.
- धनंजय कुलकर्णी, मुंबई पोलीस प्रवक्ते


‘सोळावं वरीस धोक्याचं !
चिमुकल्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे तेही गुन्हेगारीच्या दिशेने पाऊल उचलतात. मात्र अल्पवयीन असल्याने बरेचदा त्यांना यातून अभय मिळते आणि त्यांची यातून सुटका होते. त्यामुळे आपण केलेल्या कृत्याबाबतचे गांभीर्य त्यांना राहत नाही.
हे टाळण्यासाठी आता शासनानेच कठोर कारवाईचे पाऊल उचलले. निर्भया प्रकरणानंतर नागरिकांचा जनक्षोभ पाहता केंद्र सरकारने गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांसाठी अल्पवयाची मर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षे केली आहे.

चुकीच्या स्पर्शांबाबत जागरूक असणे आवश्यक
-आपल्या मुलांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींची माहिती जाणून घ्यावी.
-आपल्या पाल्याला एकट्या केअर टेकरच्या जबाबदारीवर घरी ठेवण्याआधी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यावी.
-आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, ते नक्की काय करतात, याची माहिती मुलांशी गप्पा मारताना मिळवावी.
-मुलाच्या शाळेची, शिकवणीची किंवा पाळणाघराची निवड काळजीपूर्वक करावी. मुले तिथे सुरक्षित आहेत का, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सौजन्याने वागतात का याची माहिती घ्यावी.
-शाळेत ये- जा करताना मुले एकटी असणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शाळेने मुलींसोबत महिला अटेंण्डट ठेवावेत.
-कुठलीही व्यक्ती ठोस कारणाशिवाय भेटवस्तू देत असेल, जवळीक करण्याचा प्रयत्न करीत असेल, एकांतात वेळ घालवण्याची मागणी करीत असेल तर वेळीच सावध व्हावे.
- त्याला लैंगिक शोषणाबद्दल माहिती द्यावी.
-किशोरवयीन पाल्याच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवावे.

आणखीन किती?
२४ आॅक्टोबर २०१४
अ‍ॅण्टॉप हिल येथे मोठ्या भावासोबत दुकानाबाहेर फटाके वाजवत असलेल्या
९ वर्षीय मुलीचे अपहरण करून २० वर्षीय नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस तपास करीत होते. २७ नोव्हेंबर रोजी कस्टम हाऊस येथे नेऊन ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नात असलेल्या अब्दुल शाह या १९ वर्षांच्या आरोपीस स्थानिकांच्या मदतीने अटक केली होती. ९ वर्षांच्या मुलीच्या बलात्काराच्या गुन्ह्यातही याच आरोपीचा सहभाग आल्याचे समोर येताच दोन बलात्काच्या गुन्ह्यांत वडाळा टीटी पोलिसांनी शाहला अटक केली.

२५ आॅक्टोबर २०१४
शिवाजीनगर येथे कपडे आणण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलीवर टेलरनेच लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. घटनेनंतर हा आरोपी चिमुरडीच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला. आरोपी कासीम खान या टेलरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती.

५ फेब्रुवारी २०१५
मुंब्रा परिसरातून अपहरण केलेल्या १३ वर्षीय चिमुरडीला अमलीपदार्थ देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ५ जणांच्या टोळीने तिला खोपोलीला नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

१ मार्च २०१५
रात्रीच्या सुमारास अंधेरी येथील ५ वर्षांच्या मुलीला रिक्षाचालकाने चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला आरे कॉलनीतील निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केला व तिला तिथेच सोडून पळ काढला होता.

७ आॅक्टोबर २०१५
घाटकोपरमधील अडीच वर्षीय चिमुरडी खाऊ आणण्यासाठी नेहमीच्या वाटेने दुकानात गेली. एका इसमाने तिला खाऊचे आमिष दाखवून डोंगरावर नेले आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला. निर्दयीपणे गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह २०० फूट खोल खाली फेकून दिला. अद्याप या मारेकऱ्याचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही.

२७ नोव्हेंबर २०१५
प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेलेल्या १३ वर्षीय मुलावर चर्चच्या फादरनेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना शिवाजीनगर येथे घडली.

Web Title: Soft Targets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.