टपाल खात्याच्या कोविड पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी सॉफ्ट टीम कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 06:37 PM2020-06-21T18:37:53+5:302020-06-21T18:38:16+5:30

कठिण परिस्थितीत टपाल विभाग पूर्ण क्षमतेने उभा राहत असल्याचे चित्र तयार झाले आहे.

Soft team working to assist Covid Positive staff of Postal Department | टपाल खात्याच्या कोविड पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी सॉफ्ट टीम कार्यरत

टपाल खात्याच्या कोविड पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी सॉफ्ट टीम कार्यरत

googlenewsNext

 

खलील गिरकर

मुंबई : कोविड 19 चा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने कोविड 19 च्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या हातापायातील त्राण नाहीेसे होत आहे. अशा प्रसंगी नेमके काय करायचे याचा विसर पडला जातो. टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना देखील कोविडची लागण  झाली आहे. त्यामुऴे टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना कोविड 19 चा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना धीर देणे, त्यांना रुग्णालयात दाखल करणे व इतर बाबींसाठी टपाल खात्याने सपोर्टिंग ऑफिशियल विथ फ्रेंडशिप अँन्ड ट्रीटमेंट (सॉफ्ट)  टीम तयार करुन अशा कर्मचाऱ्यांच्या मागे अशा कठिण परिस्थितीत टपाल विभाग पूर्ण क्षमतेने उभा राहत असल्याचे चित्र तयार झाले आहे. 

मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या संकल्पनोतून ही सॉफ्ट टीम तयार करण्यात आली आहे.  ज्या कर्मचाऱ्यांचा कोविड 19 च्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना तत्काळ आवश्यक वैद्यकीय मदत पोचवणे,  त्यासाठी आवश्यक ते समन्वय करणे,  रुग्णाच्या कुटुंबियांना कॉरन्टाईन करताना त्यांच्या कॉरन्टाईनची व्यवस्था करणे,  त्यांना अन्नधान्य, किराणा सामान पोचवणे, भाजीपाला, औषधे पोचवणे, मानसिक आधार देणे अशी कामे या सॉफ्ट टीमद्वारे केली जात आहेत. कोरोना संक्रमणाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून पीपीई कीट,  वैद्यकीय उपकरणे व इतर अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू पोचवण्याचे काम पोस्टमन व पोस्टवुमन यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत नियमितपणे केले आहे. 

त्यापैकी काही जणांना दुर्देवाने कोविड 19 ची लागण झाली आहे. टपाल खात्याच्या मुंबई विभागातील 27 जणांना आतापर्यंत कोविड 19 ची लागण झाली असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यु झाला आहे. या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना या कठिण समयी आधार देण्यासाठी सॉफ्ट टीम कार्यरत अाहे. कोविड 19 ची चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या टपाल कर्मचाऱ्यांना त्वरित मदत पोचवण्यासाठी बनवण्यात आलेल्या या सॉफ्ट टीमचे काम सुलभपणे चालावे व त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी स्वाती पांडे स्वत: मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल,  नगरसेवक व स्थानिक प्रशासनासोबत नियमितपणे संपर्कात आहेत. 

 

कोविडची लागण झालेल्या टपाल कर्मचाऱ्यांना सॉफ्ट टीमच्या माध्यमातून सहकार्य करुन त्यांच्या सोबत टपाल. विभाग असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात आहे. कोविडची लागण झाल्यावर निर्माण होणाऱ्या तणावाच्या वेळी अशा कर्मचाऱ्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती असल्याने त्यांचा तणाव काहीसा कमी होऊ शकतो. 

- स्वाती पांडे,  पोस्ट मास्टर जनरल, मुंबई विभाग

Web Title: Soft team working to assist Covid Positive staff of Postal Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.