मनीषा म्हात्रे मुंबई : प्रेमासाठी कायपण म्हणत, पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी एका सॉफ्टवेअर इंजिनियर पठ्ठ्याने थेट विशेष शाखेचे पासपोर्ट सेवा हॅक पासपोर्ट क्लियर केल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी नुकतेच उत्तरपदेशातील सॉफ्टवेअर इंजिनियर राजा बाबू शहाला (२७) याला अटक केली आहे. त्याने हे कसे केले? याबाबत सायबर पोलीस अधिक तपास करत आहे.
२४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ च्या सुमारास शासकिय सुट्टी असल्याने कार्यालय बंद असताना देखील ३ फाईल्स क्लियर झाल्याचे २६ सप्टेंबर दिसून आल्याने त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळवले. त्यानुसार चौकशी सुरु केली. एका महिला अधिकाऱ्याच्या आयडीवरून तिन्ही फाईल क्लियर झाल्याचे दिसून आले. याबाबत दिल्लीला मेल पाठवून चौकशी करण्यात आली. तेथून आयपी अॅड्रेसची माहिती मिळताच कोणीतरी अनोळखी व्यक्तीने पासवर्ड आयडी हँक करून हा प्रताप केल्याची खात्री होताच याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.
सायबर पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाने याबाबत अधिक तपास केला. पारपत्र शाखा २ येथे पोलीस निरीक्षक पांडुरंग सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. विदेश मंत्रालय, भारत सरकारने यासाठी पासपोर्ट पोर्टल तयार केले असून त्याचा सर्व्हर व यंत्रणा दिल्लीत आहे. अशात पासपोर्ट कार्यालयातील पोलीस अधिकाऱ्याला स्वतंत्र पासवर्ड आयडी देण्यात आला आहे.
चेंबूर, टिळकनगर, अँटॉपहील येथील महिलांचे हे पासपोर्ट होते. याबाबत दक्षिण प्रादेशिक विभागाने तपास सुरु केला. तिन्ही महिलांकडे चौकशी केली. त्यापैकी एका महिलेला परदेशात नोकरीसाठी जायचे असल्याने तिने अर्ज केला होता. हाच धागा पकडून पथकाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने गाझियाबाद येथून राजा बाबू शहाला (२७) ताब्यात घेतले. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीला परदेशात जाण्याची इच्छा होती. तसेच, तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी त्याने हॅक करून पासपोर्ट क्लियर केल्याची माहिति समोर आली आहे.