लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: वर्सोवा पोलिसांनी तामिळनाडू येथील एका वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक केली आहे, ज्याने सोशल मीडियावर प्रसिध्द दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्य नावाने बनावट खाते बनवले. तसेच त्यामार्फत त्याने नवीन अभिनेत्री आणि मॉडेल्सकडून फोटोही मागवले होते.
आरोपी शनमुगा वाडीवेल थांगवेल (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बनावट इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट तयार केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा काही मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी प्रत्यक्ष चित्रपट निर्मात्याच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधत त्यांना सोशल मीडियावरील त्यांचे संभाशणाबद्दल सांगितले. श्रीरामला याना ही माहिती मिळाली.
मात्र त्यांचे इन्स्टाग्रामवर अकाउंट नसल्यामुळे तसेच फेसबुकवरही ते सक्रीय नसल्यामुळे त्याना धक्काच बसला व त्यानंतर त्याने वर्सोवा पोलिसांशी संपर्क साधत आणि एप्रिलमध्ये तक्रार दाखल केली असे.एका अधिकाऱ्याने सांगितले. “आम्ही भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४१९ (व्यक्तीद्वारे फसवणूक) आणि आयटी कायद्याच्या ६६ (संगणक-संबंधित गुन्हे) अंतर्गत गुन्हा नोंदवला. परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे आणि वरिष्ठ निरीक्षक सिराज इनामदार यांच्या देखरेखीखाली सहायक पोलीस निरीक्षक जावेद शेख यांनी तपास सुरू केला. काही महिन्यांनंतर आरोपीचा आयपी पत्ता शोधण्यात ते यशस्वी झाले आणि शेवटी त्याला २६ सप्टेंबर रोजी तामिळनाडूमध्ये पकडत नंतर मुंबईत आणण्यात आले. शनमुगा हा झेरॉक्स सेंटरमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि सॉफ्टवेअरशी संबंधित काम करत होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो अविवाहित आहे. त्याने श्रीरामच्या नावाखाली तीन बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले. त्याची कार्यपद्धती पाहता आम्हाला शंका आहे की त्याने इतर सेलिब्रिटींचे देखील असे बनावट खाते तयार केले असावे. मात्र अद्याप आम्हाला इतरांकडून या संदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही असेही पोलिसांनी नमूद केले. बुधवारी षणमुगाला न्यायालयात हजर केले असता त्याला १ पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राघवन हे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत जे त्यांच्या निओ-नॉयर थ्रिलर्ससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी एक हसीना थी (२००४), जॉनी गद्दार (२००७) आणि अंधाधुन (२०१८) सारख्या हिंदी क्लासिक्सचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.