लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलुंड परिसरातील यश दोशी (३१) हे बंगळुरू येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला आहेत. ते ६ मे रोजी पत्नीसह फिरायला दक्षिण आफ्रिकेला गेले होते.
२० मे रोजी जोहन्सबर्ग येथून भारतात परतताना त्यांच्यासोबत मोठ्या आकाराच्या तीन बॅगा होत्या. या विमानतळावर चेकिंग करून त्यांनी त्या एअरलाइन्स कर्मचाऱ्यांकडे सोपविल्या. त्यानुसार बॅगला टॅगही लावले होते. ते आदीस अबाबा येथे गेले आणि तिथून ते २१ मे रोजी रात्री २ वाजता मुंबईविमानतळावर पोहोचले. कस्टम क्लिअरन्स पूर्ण झाल्यावर ते खासगी टॅक्सीने घरी पोहोचले, त्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यावरील टॅग काढण्यात आला होता. तसेच त्यातील एक कॅमेरा आणि ९०० अमेरिकन डॉलर म्हणजे ७४ हजार ५०० रुपये रोख रक्कमही काढण्यात आली होती.
याप्रकरणी त्यांनी फोनवरून इथोपेया एअरलाइन्सकडे तक्रार केली. मात्र जिथून त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सहार पोलिस ठाण्यात त्यांनी अनोळखी चोराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.