Join us  

एसी लोकलमध्ये ‘सॉफ्टवेअर’ बिघाड

By admin | Published: May 07, 2016 2:16 AM

मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी लोकल दाखल होताच ही लोकल प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या लोकलची चाचणी होण्यापूर्वीच मध्य रेल्वेसमोर अनेक

मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी लोकल दाखल होताच ही लोकल प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या लोकलची चाचणी होण्यापूर्वीच मध्य रेल्वेसमोर अनेक अडचणींचे डोंगर उभे राहिले आहेत. एसी लोकलच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली असून, ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही समस्या सोडविताच त्याच्या चाचणीसाठी आणि प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सूद यांनी यावेळी दिली. ही लोकल सध्या कुर्ला कारशेडमध्ये उभी करून ठेवण्यात आली आहे. या लोकलमध्ये काही इलेक्ट्रिकलची कामे पूर्ण केली जात आहेत. एसी लोकलची येत्या १५ मे पासून ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर चाचणी करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेकडून ठेवण्यात आले होते. मात्र मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे चाचणीसाठी लागणारी कागदपत्रेही सादर करण्यात न आल्याने १५ मेपासून चाचणी होऊ शकत नसल्याचे समोर आले. याबाबत मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद म्हणाले की, ५४ कोटी रुपयांची एसी लोकल आमच्या ताफ्यात दाखल झाली. या लोकलमध्ये काही तांत्रिक कामे पूर्ण केली जात आहेत. चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) ही कामे पूर्ण केली जाणार होती. मात्र मुंबईतच एसी लोकल दाखल करून कुर्ला कारशेडमध्ये ती कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कामे भेलकडून (भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेड) केली जात आहेत. सध्या एसी लोकलच्या सॉफ्टवेअरमध्येच काही तांत्रिक समस्या रेल्वेला जाणवत आहेत. त्या सोडविण्यासाठी भेलसोबत एक बैठकही घेण्यात आली आहे. त्यामुळे समस्या लवकरच सोडविली जाईल आणि २५ मेच्या आधीपासून ही चाचणी करण्याचा प्रयत्न असेल. हार्बरवर १२ डबा लोकल होण्यास लागणार वेळहार्बरवर १२ डबा लोकल टप्प्याटप्याने सुरू होण्यास थोडा वेळ लागेल. उज्जैन येथे कुंभमेळा होत असून, भाविकांची गर्दी पाहता पश्चिम रेल्वेने काही गाड्या तेथे पाठवल्या आहेत. त्यात दोन लोकलचाही समावेश आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेला हार्बर मार्गावर चालविण्यासाठी मिळणाऱ्या १२ डबा लोकलचे वेळापत्रकच बिघडले आहे. कुंभमेळा संपल्यानंतर या लोकल पश्चिम रेल्वेला पुन्हा मिळतील आणि त्यानंतर त्या मध्य रेल्वे हार्बर मार्गावर दाखल केल्या जातील, अशी माहिती सूद यांनी दिली.