मुंबई : यूएईवरून मुंबईत आल्यानंतर नियमानुसार हॉटेलमध्ये क्वारंटाईन न होता परस्पर घरी निघून गेलेले अभिनेते अरबाज, सोहेल आणि त्याचा मुलगा निर्वाण खान यांना मंगळवारी अखेर वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. मात्र या तिघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.
हे तिघे २५ डिसेंबर रोजी यूएईवरून मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. नियमानुसार त्यांना वांद्रे येथील ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये सात दिवस क्वारंटाईन करण्यात येणार होते. मात्र त्यांनी हॉटेलचे बुकिंग रद्द करून परस्पर घर गाठले. याची गंभीर दखल घेऊन पालिकेच्या एच पश्चिम विभागाने खान बंधूंविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र आपला चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यामुळे विमानतळावरून थेट घरी गेलो, असा बचाव सोहेल खान यांनी केला. पालिकेने मंगळवारी पोलिसांच्या सहकाऱ्याने सोहेल, अरबाज आणि निर्वाण खान यांना क्वारंटाईन केले. तसेच खबरदारी म्हणून पालिकेने खान कुटुंबातील अन्य सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत का? याची चौकशी केली.