मिठी नदीत डम्परच्या साहाय्याने टाकला जातोय माती, डेब्रिजचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 01:12 AM2021-02-11T01:12:00+5:302021-02-11T01:12:13+5:30

१० जानेवारीपासून सुमारे हजारो डंपरच्या साहाय्याने येथे भराव टाकला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सय्यद अकबर हुसेन यांनी केला आहे.

The soil is being dumped in the Mithi river with the help of a dumper, filling the debris | मिठी नदीत डम्परच्या साहाय्याने टाकला जातोय माती, डेब्रिजचा भराव

मिठी नदीत डम्परच्या साहाय्याने टाकला जातोय माती, डेब्रिजचा भराव

googlenewsNext

- ओमकार गावंड

मुंबई : एकीकडे प्रशासन मिठी नदीची साफसफाई व सुशोभीकरण करण्यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. परंतु याच मिठी नदीत डंपरच्या साहाय्याने माती व डेब्रिजचा भराव टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कुर्ला पश्चिम येथील बॉम्बे टॅक्सीमेन को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटीला लागून असलेल्या मिठी नदीच्या किनाऱ्यावर हा भराव टाकला जात आहे. १० जानेवारीपासून सुमारे हजारो डंपरच्या साहाय्याने येथे भराव टाकला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सय्यद अकबर हुसेन यांनी केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सोसायटीकडे विचारणा केली असता. त्यांनी भराव टाकला जात असलेली जागा सोसायटीची असल्याचे सांगितले. परंतु नदीमधील जागा एखाद्याच्या मालकीची कशी असू शकते, असा सवाल हुसेन यांनी उपस्थित केला आहे. 

याप्रकरणी त्यांनी २५ जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, मुख्यमंत्री, पर्यावरण खाते व पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. मात्र यात कोणावरही कारवाई झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २६ जुलैच्या महापुरात मिठी नदीने रौद्र रूप धारण केले होते. या महापुरात शेकडो मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले होते. या महापुरात मिठी नदीच्या लगत असणाऱ्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पावसातदेखील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. यावेळी कुर्ला परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे मिठी नदीतील भराव भविष्यात धोकादायक ठरू शकतो.

कुर्ला येथे मिठी नदीत डंपरच्या साहाय्याने भराव टाकला जात असल्याची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यासाठी एमएमआरडीए, बॉम्बे टॅक्सीमेन को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी व संबंधित प्रशासनासोबत बैठक घेण्यात येणार आहे. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल.
 - मनीष वळंजू , 
सहायक आयुक्त, एल विभाग

Web Title: The soil is being dumped in the Mithi river with the help of a dumper, filling the debris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.