लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई-रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शालवाडीची घटना ताजी असतांनाच आज पहाटे दोनच्या सुमारास अंधेरी पूर्व,महाकाली रोड,गुरुनानक रोड येथील रामबाग कॉ हौसिंग सोसायटी या एसआरएच्या ७ मजली इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रामबाग डोंगराळ भागातून माती आणि दगड पडले. या इमारतीमध्ये एकूण १६८ खोल्या आहेत.
यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भीमेश मुतुला यांनी लोकमतला ही माहिती दिली. रात्रभर आणि दिवसभर आपण घटनास्थळीच होतो अशी माहिती त्यांनी दिली.
या दुर्घटनेत येथील बी इमारतीचे पहिल्या मजल्यावर सहा, दुसऱ्या मजल्यावर ४ आणि तळमजल्यावर १ अश्या ११ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरांमध्ये रामबाग डोंगराळ भागातून माती आणि मोठे दगड पडले असून घरात मलबाचा खच पडला असल्याची माहिती त्यांनी दिली. येथील इमारतीच्या दुर्घटनाग्रस्त नागरिकांना सध्या पीएपीच्या सातव्या मजल्यावर शिफ्ट केल्याची माहिती मुतुला यांनी दिली.
या इमारतीच्या मागील बाजूस डोंगर असून बिल्डरने फक्त तीन फूटांचे अंतर ठेवून साधी रुग्णवाहिका जायला जागा सुद्धा ठेवली नसल्याची माहिती त्यांनी दिली.अश्या परिस्थितीत त्याला ओसी कशी दिली असा सवाल त्यांनी केला.येथील बिल्डरने नागरिकांच्या झालेली नुकसानभरपाई दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.