विमानतळाला जोडण्याच्या वाढीव मार्गिकेसाठी माती परीक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:59 AM2020-03-08T00:59:35+5:302020-03-08T01:00:02+5:30
या मार्गिकेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असल्याने लवकरच बांधकामही सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसआयए) टर्मिनल-२ ला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेच्या माती परीक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. भू-तांत्रिक (जिओ टेक्निकल) माती परीक्षणाच्या कामाला खाजगी विकासकामार्फत सुरुवात करण्यात आली आहे. ३.१७ किमी लांबीच्या भुयारी मार्गिकेसाठी हे काम सुरू करण्यात आले आहे.
ज्या खाजगी कंपन्यांनी निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता त्या सर्व कंपन्यांना भौगोलिक तपासणी अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उपलब्ध करून दिला आहे. मात्र कंत्राटदारांना बांधकाम करण्यापूर्वी पुन्हा तपासणी करून आराखडा निवडावा लागणार आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशा मेट्रो-७ मार्गिकेचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. या मेट्रो-७ मार्गिकेचा विस्तार म्हणजेच मेट्रो-९ ही मार्गिका आहे. दहिसर पूर्व ते मीरा भार्इंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अंतर १३.५४ किमी इतके असणार आहे. यामध्ये २.९१५ किलोमीटरचे अंतर हे भूमिगत असणार आहे. अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ही मार्गिका मेट्रो-३ अणि मेट्रो-८ मार्गिकांनाही जोडणार आहे.
एमएमआरडीएने या मार्गिकेचे काम हे जे कुमार या कंपनीला दिले आहे. या मार्गिकेच्या कामासाठी सुमारे १९९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये हे काम देण्यात आले होते. दहिसर पूर्व ते मीरा भार्इंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो-९ मार्गिकेवर एकूण ११ स्थानके आहेत.
या मार्गिकेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असल्याने लवकरच बांधकामही सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो-९ या मार्गिकेवर बॅरिगेट्स
बसवण्यात आले असून इतर पूर्व कामे म्हणजेच माती परीक्षणाच्या कामासह सर्वेक्षण, पाइप लोड अशा कामांना सुरुवात करण्यात आली आहे.