लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऊन्हाळ्याचे चटके आता महाराष्ट्राला आणखी बसू लागले आहेत. शनिवारी तर राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या घरात नोंदविण्यात आले असून, मुंबईचे कमाल तापमान ३४.८ अंश नोंदविण्यात आले आहे. मुंबईचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत कमी असले तरी राज्याचा पारा मात्र अधिकाधिकच नोंदविण्यात येत आहे.
हवामान शास्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठावाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच दुसरीकडे बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ५ एप्रिल रोजी कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. ६ एप्रिल रोजी मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. ७ आणि ८ एप्रिल रोजी विदर्भात पाऊस पडेल.
मुंबईचा विचार करता मुंबईचे हवामान कोरडे नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमान अद्यापही ३४ अंश नोंदविण्यात येत असून, कमाल तापमान स्थिर असल्याने अद्याप मुंबईकरांना ऊन्हाचे म्हणावे तसे चटके बसलेले नाहीत. रविवारीसह सोमवारीदेखील मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. आणि आकाश निरभ्र राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.-----------------------------शनिवार तापदायक
जळगाव ४०
मुंबई ३४.८
सोलापूर ४०.४
सांगली ३८.२
नाशिक ३७.८
पुणे ३९.१
मालेगाव ४०.८