मुंबई : रविवारी, २१ जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहणभारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. कुरूक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. सूर्याची प्रकाशित गोलाकार कडा दिसत असते. त्यालाच कंकणाकृती अवस्था म्हणतात. तशी कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. २१ जून रोजी सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून २ मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.....................................कुठे कोणत्या वेळेत दिसेल हे सूर्यग्रहण- मुंबईतून सकाळी १० वाजून ०१ मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीत जास्त सुमारे ७० टक्के ग्रासित दिसेल. दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.- पुणे येथून सकाळी १०-०३ ते दुपारी १-३१- नाशिक येथून सकाळी १०-०४ ते दुपारी १-३३- नागपूर येथून सकाळी १०-१८ ते दुपारी १-५१- औरंगाबाद येथून सकाळी १०-०७ ते दुपारी १-३७- सूर्यग्रहण आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल.....................................- २६ डिसेंबर २०१९ रोजी सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळीही उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते.- आता भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग २१ मे २०३१ रोजी येणार आहे. त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसणार आहे.- महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशीरा म्हणजे ३ नोव्हेंबर २४०४ रोजी आहे.
येत्या रविवारी सूर्यग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 5:56 PM