येत्या रविवारी दिसणार सूर्यग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:11 AM2020-06-17T02:11:34+5:302020-06-17T02:11:52+5:30
कंकणाकृती अवस्था; उर्वरित भारतातून खंडग्रास स्थितीत
मुंबई : रविवार, २१ जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण असून ते भारतातून दिसेल. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरयाणा व उत्तराखंड राज्यांतील काही प्रदेशांतून दिसणार आहे. तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल. कुरुक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल, अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
खग्रास सूर्यग्रहणावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. सूर्याची प्रकाशित गोलाकार कडा दिसते. त्यालाच ‘कंकणाकृती अवस्था’ म्हणतात. तशी कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. २१ जून रोजी सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजून १ मिनिटापासून १२ वाजून २ मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.
कुठे कोणत्या वेळेत दिसेल?
मुंबईतून सकाळी १० वाजून ०१ मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीत जास्त सुमारे ७० टक्के ग्रासित दिसेल. दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.
पुणे येथून सकाळी १०.०३ ते दुपारी १.३१ वाजेपर्यंत.
नाशिक येथून सकाळी १०.०४ ते दुपारी १.३३ वाजेपर्यंत.
नागपूर येथून सकाळी १०.१८ ते दुपारी १.५१ वाजेपर्यंत.
औरंगाबाद येथून सकाळी १०.०७ ते दुपारी १.३७ वाजेपर्यंत.
सूर्यग्रहण भारताव्यतिरिक्त आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलईस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथूनही दिसेल.
कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग
२६ डिसेंबर २०१९ रोजी सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळीही उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. आता भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग २१ मे २०३१ रोजी येईल. त्याची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसेल. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशिरा म्हणजे
३ नोव्हेंबर २४०४ रोजी आहे.