राज्यातील महामार्गावर होणार सौरऊर्जेचा वापर-आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 06:05 AM2021-01-12T06:05:32+5:302021-01-12T06:05:51+5:30
बेस्टच्या ताफ्यात पाच वर्षांत ३० टक्के इलेक्ट्रिक बस होणार दाखल
मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित ऊर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरऊर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण ३० टक्के इलेक्ट्रिक बसेस आणणे यासह विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या जलद अवलंबनासाठी आणि महाराष्ट्र वाहन धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध भागधारकांसमवेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुढील पाच वर्षात राज्यात इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चालना देण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. परिवहन मंत्री परब म्हणाले की, आपल्याला ई-मोबिलिटीवर जायचे असेल तर मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासणार आहे. कार्यशाळेत दिवसभर झालेल्या चर्चेत टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, ओलेक्ट्राचे शरथ चंद्रा, टीव्हीएस मोटार्सचे कमल सूद, उबेरचे महादेवन नंबियार, युलुचे श्रेयांश शहा, ॲम्बिलिफी मोबिलिटीचे चंद्रेश सेठिया, व्हिजन मेकॅट्रॉनिक्सच्या राशी गुप्ता, ऑक्टीलियन पॉवर सिस्टीम्सचे यशोधन गोखले, युमिकोअरचे केदार रेले आदींनी सहभाग घेतला.
एसटीच्या इंधनावर तीन हजार कोटींचा खर्च
n एसटीमध्ये सध्या इंधनावर सुमारे तीन हजार कोटी रुपयाचा खर्च होतो. पण इलेक्ट्रिक बसेस वापरल्यास या खर्चात मोठी बचत होणार आहे. सध्या एसटी संकटात असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी ‘गो ग्रीन’कडे वळणाशिवाय पर्याय नाही. याअनुषंगाने येत्या काळात एसटीमध्येही इलेक्ट्रिक बसेसच्या वापराला चालना देण्यात येईल, असेही ॲड. परब यांनी सांगितले.
बेस्टमध्ये पाच वर्षात ३० टक्के इलेक्ट्रिक बसेस आणणे, महामार्गावर सौरऊर्जेचा वापर उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येईल.