Join us

सौरदिव्यांच्या निर्मितीतून करणार सौरऊर्जेचा प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 3:52 AM

विद्यार्थी बनले सौरदूत : पुणे, नाशिक, गडचिरोली आणि बीडमध्ये १,१४५ सौरदिव्यांची निर्मीती

मुंबई : आयआयटी मुंबई आणि एम.एन.आर.ई. (मिनिस्ट्री आॅफ न्यू अ‍ॅण्ड रिन्यूएबल एनर्जी) या संस्थांकडून १०० सौरवीजदिव्यांसाठी लागणारे सुटे साहित्य मिळवत मोहित शहाणे यांनी राज्यभरातील शाळेत ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सौरवीजदिवे जोडणी आणि निर्मिती’ हा उपक्रम हाती घेतला. याद्वारे राज्यभरात विद्यार्थीमित्रांना सौरदूत बनविण्याचे काम सुरू केले आहे. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी त्यांच्या लहान वयात स्वत:ची सौर साधने बनवायला, त्यांचा वापर करायला शिकले तर ते त्यांच्या पिढ्यांमध्येही त्याचा प्रचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मोहित शहाणे यांनी यासंदर्भात सांगितले की, सौरऊर्जा वर्तमान आणि भविष्य आहे. लहान मुलांना याचे महत्त्व समजावले तर भविष्यात त्यांच्याकडून सौर साधनांची निर्मिती होऊ शकते. आज देशातील ४० टक्के कुटुंबे केरोसिनचा वापर प्रकाशासाठी मुख्य स्रोत म्हणून करतात. रात्रीच्या वेळी अभ्यास करताना केरोसिनचे कंदील जळतात. त्यामुळे केरोसिनचा धूर होतो. परिणामी, सौर दिव्यांबाबत राज्यभरात विविध शाळांमध्ये हाती घेण्यात आला. या विद्यार्थ्यांना सौर दिव्यांसाठीच्या सुट्या भाग देण्यात आले. त्यांनतर त्यांना या भागाचे तांत्रिक नाव, त्याचा उपयोग कशासाठी होतो, त्या भागाची गुणवत्ता चाचणी कशी करावी याबाबत माहिती दिली. तसेच या सर्व भागांची जोडणी कशी करावी, याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या सूचनांचे पालन केले; आणि उत्तरोत्तर हा उपक्रम अनेक शाळांत यशस्वी होत गेला.

१) शाळा आणि आयआयटी मुंबई यांनी संयुक्तपणे या कार्यशाळेचे आयोजन मुलांसाठी वैकल्पिक शिक्षण म्हणून केलेले आहे. शालेय मुलांमध्ये या प्रकारच्या कार्यशाळांची कमतरता आहे. अनेक कार्यशाळांदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वत: कुठल्याही प्रकारची मदत न घेता दिवे तयार केले.२) ज्या सूचना विद्यार्थ्यांना केल्या त्या प्रमाणे विद्यार्थी दिव्यांची जोडणी करीत गेले. विद्यार्थ्यांच्या मनाच्या वैज्ञानिक जिज्ञासेसह भविष्यासाठी त्यांना सौरदूत बनवून स्वच्छ तंत्रज्ञानाकडे वळविले गेले.३)महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी त्यांनी स्वत: बनविलेला सौरदिवा आणि २.५ वॅटचे सौरपॅनल घरी घेऊन गेले.