पालिके मार्केट मध्ये सौर ऊर्जेचा प्रकाश
By जयंत होवाळ | Published: June 13, 2024 09:16 PM2024-06-13T21:16:27+5:302024-06-13T21:18:07+5:30
मार्केटच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल युनिट बसवले जाणार आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेचे मार्केट आता सौर ऊर्जेने प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या विजेच्या खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता आहे. मार्केटच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल युनिट बसवले जाणार आहे. हे काम टप्प्याटप्प्याने होणार आहे.
सौर ऊर्जा पॅनेल बसवण्याची योजना टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पालिकेच्या चार मार्केटच्या बिल्डिंगच्या छतावर सौर पॅनेल बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाबू गेनू मार्केट, डॉकयार्ड रोडच्या छतावर २५ किलोवॅट सौर प्रणाली यंत्रणा बसवण्यात येईल. डॉ. शिरोडकर मार्केट, परळ येथे २५ किलोवॅट सौर प्रणाली आणि महात्मा ज्योतिबा फुले मार्केट (क्रॉफर्ड मार्केट) येथे २५ किलोवॅट सौर प्रणाली बसविण्यात येणार आहे.
या चार मार्केटमधील सौर ऊर्जाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य मार्केटमध्ये सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे. पालिकेच्या अखत्यारीत ९२ किरकोळ मंडया व समायोजन आरक्षण अंतर्गत प्राप्त झालेल्या १०८ मंडया आहेत. त्याशिवाय १६ खाजगी मंडया असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. त्यामुळे पालिका प्रत्येक मार्केटच्या छतावर सोलार पॅनल उभारून, मार्केटमधील गाळेधारकांना वीज पुरवठा केला जाईल. या गाळेधारकांकडून सोलार पॅनेलचे बिलही घेण्यात येणार आहे. मात्र हे बिल सध्याच्या वीज बिलापेक्षा कमी असेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
याचबरोबर मार्केटमधील सीएफएल दिवे बदलून त्याऐवजी एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. ट्रान्झिट कॅम्प, बाबू गेनू मार्केट, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, गोवंडी येथील लक्ष्मण बाबू मोरे म्युनिसिपल मार्केट आणि बी. एच. चेंबूरकर मार्केटचा पुनर्विकास झाल्यानंतर तेथे सौर ऊर्जेवरील दिवे बसवण्यात येणार आहेत.