राजभवनात सौरऊर्जेवर चालणार हवामान केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 08:12 AM2023-01-02T08:12:36+5:302023-01-02T08:19:40+5:30
अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कला दिलेल्या आर्थिक सहकार्यातून हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
मुंबई : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे सौरऊर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून मुंबईतील तापमान, प्रदूषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, अतिनील किरणे, कार्बनडाय ऑक्साईडची पातळी आदी विषयक अचूक माहिती पाहता येणार आहे.
अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कला दिलेल्या आर्थिक सहकार्यातून हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून मिळालेली हवामानासंबंधी माहिती राजभवनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होईल, असे भारत-अमेरिका अभ्यास केंद्राच्या संचालिका प्रा. पारोमिता सेन यांनी सांगितले. लवकरच एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहू परिसर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही हवामान केंद्र स्थापन केले जाणार आहे.
जागतिक हवामान बदल हे जागतिक पातळीवरील गंभीर आव्हान आहे. विद्यापीठे, शिक्षक व संशोधक यांनी या विषयावर निकडीने काम केले पाहिजे आणि अशा अधिकाधिक प्रकल्पाची निर्मिती करायला हवी.
- भगतसिंह कोश्यारी,
राज्यपाल, महाराष्ट्र राज्य