‘प्रदूषण’मुक्तीसाठी ‘सोलरवालाबेस्ट’ अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:09 AM2020-01-23T03:09:23+5:302020-01-23T03:10:01+5:30

सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा, बेस्ट बस सौरऊर्जेवर धावण्यासंदर्भात विचार करण्याची व्यक्त केली गरज

SolarWallbest campaign for 'pollution' | ‘प्रदूषण’मुक्तीसाठी ‘सोलरवालाबेस्ट’ अभियान

‘प्रदूषण’मुक्तीसाठी ‘सोलरवालाबेस्ट’ अभियान

Next

मुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण लक्षात घेता यावर उपाय तसेच यासंदर्भात जनजागृतीसाठी वातावरण फाउंडेशनने #सोलरवालाबेस्ट हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व मुंबईकरांना पटवून देण्याचे काम सुरू केले आहे. पथनाट्य आणि गाण्यांच्या माध्यमातून यासंदर्भातील जनजागृती सुरू असून, सौरऊर्जेवर बेस्ट बस कशी धावेल? यावर प्रशासनाने अधिकाधिक विचार करावा, असे म्हणणे वातावरण फाउंडेशन सातत्याने मांडत आहे.
नुकतेच सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे याविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला. पथनाट्य आणि गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मुंबईतील अनेक बस थांबे, महाविद्यालये येथे दाखल होत अभियानाविषयी व पर्यावरणाविषयी जनजागृती केली. या पथनाट्यातून लोकांना असे आवाहन करण्यात आले की, खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा. सार्वजनिक वाहतूक सेवा विजेवर आधारित सुरू करावी. सौरऊर्जेवर या सेवा सुरू केल्यास प्रदूषण होणार नाही आणि मुंबईची हवा शुद्ध राहण्यास मदत होईल. विशेषत: लोकप्रतिनिधींनी यावर व्यक्त व्हावे आणि सकारात्मक पावले उचलावीत, असेही आवाहन करण्यात आले.
मुळात पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या वापरामुळे प्रदूषणात भर पडत आहे. हे ऊर्जेचे शाश्वत स्रोत नसून, आज-उद्या ते संपणार आहेत. परिणामी, काळाजी गरज म्हणून सौरऊर्जेचा आग्रह धरला पाहिजे. विशेषत: बेस्ट बस सौरऊर्जेवर कशी धावेल? याचा विचार केला पाहिजे, असे म्हणणे अभियानाच्या माध्यमातून पटवून दिले जात आहे.

बक्षिसासाठी नव्हे, तर जनतेच्या आरोग्याला महत्त्व
सध्या सर्वच महाविद्यालयांच्या स्पर्धा सुरू असताना सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बक्षिसासाठी स्पर्धेत न उतरता जगण्यासाठी, जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी तसेच मुंबईकरांना स्वच्छ-शुद्ध, प्रदूषणविरहित श्वास घेता यावा यासाठी #सोलरवालाबेस्ट या जनजागृती अभियानामध्ये पुढाकार घेतला.
- राहुल सावंत, समन्वयक, वातावरण फाउंडेशन

जे लोक सातत्याने सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करीत आहेत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना ‘धन्यवाद’ असे स्टिकर्सही देण्यात येत आहेत. तर, जे लोक सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करीत नाहीत त्यांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.

खासगी वाहनांचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती

क्रॉस मैदान, फोर्ट येथील बस आगार येथे नुकतेच हे अभियान सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राबविण्यात आले असून, लोकांनीही अभियानास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबईत खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात प्रवासासाठी वापर होतो. हा वापर कमी व्हावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
बेस्टचे चालक आणि वाहक यांच्यामुळे बेस्ट सेवा, सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू आहे. ती तशीच टिकून राहावी व अधिक मजबूतही व्हावी म्हणून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Web Title: SolarWallbest campaign for 'pollution'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.