मुंबई : आयआरएस अधिकारी शक्तिवेल राजू यांच्या भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दोघे जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी पहाटे घडली. या भीषण अपघातात पांडुरंग कोकरे (४०) यांचा मृत्यू झाला, तर अशोक भंडारी (५५) गंभीर जखमी झाले. राजू यांना अटक करण्यात आली असून, त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली.बेलापूर सीबीडी येथील रहिवासी असलेले राजू हे कस्टम विभागात अतिरिक्त आयुक्तपदी (मुलुंड विभाग) कार्यरत आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते अंधेरीतील मित्राला भेटून मानखुर्दमार्गे अर्टीका कारने (क्रमांक एम.एच. ०२ सी. डब्ल्यू. ९२२६) घराच्या दिशेने निघाले. त्याच दरम्यान मानखुर्दच्या मोहिते पाटील नगर येथून जात असताना, त्यांच्या वाहनाने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोघांना धडक दिली. दोघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कोकरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. भंडारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी राजू यांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.भंडारी नुकतेच खासगी कंपनीत नोकरीला लागले आहेत. तर रिक्षाचालक कोकरे हे येथीलच त्रिमूर्ती चाळीतील रहिवासी होते. या घटनेमुळे कोकरे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. राजू नशेत होते का, याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय वेर्णेकर यांनी दिली.
सनदी अधिका-याच्या गाडीने दिलेल्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:11 AM