मुंबई : मंत्रालयाजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या ३६ वर्षीय पुष्कर शिंदे या जवानाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने मंगळवारी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९.५० च्या सुमारास ही घटना घडली. शिंदे यांची एका शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंत्रालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर स्ट्रायकिंग क्रमांक ३ (एसआरपीएफ ग्रुप क्रमांक २, पुणे, डी कंपनी, प्लाटून क्रमांक १) येथे त्यांना तैनात करण्यात आले होते. त्यांची तुकडी ६ जानेवारीपासून मंत्रालय परिसरात बंदोबस्तासाठी तैनात आहे. रात्रपाळीनंतर सकाळी ते डोंगरी येथील पालिकेच्या शाळेत आले होते. खोलीत एकटे असताना त्यांनी रायफलने स्वतःवर गोळी झाडली. त्यांना तत्काळ जे जे रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित केल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. हरी बालाजी एन. यांनी सांगितले. शिंदे हे मूळचे पुण्याचे रहिवासी होते. ते पत्नीसोबत राहत होते. वैयक्तिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे.