मुंबई : भारतीय लष्करात सेकंड बटालियन आॅफ दी महार मशीनगन रेजिमेंट म्हणजे भारतीय पैदल दलातील महार रेजिमेंटमध्ये २७ डिसेंबर, १९५४ साली भरती झालेल्या वसंत कांबळे या सैनिकाच्या विधवा पत्नी फुलाबाई कांबळे यांच्या पेन्शनच्या लढ्याला यश आले. ७२ वर्षांनी त्यांना पेन्शन मिळेल. त्या सातारा, कराड तालुक्यातील चरेगावच्या रहिवासी आहेत.१९५४ साली वयाच्या १८व्या वर्षी वसंत कांबळे सैन्यात भरती झाले. पहिली पोस्टिंग जम्मू-काश्मीरमधील सियाचीन ग्लेशियर बॉर्डरवर झाली. युद्धजन्य परिस्थितीत ते जखमी झाले. त्यांना तत्कालीन सेनासेवा नियमानुसार त्यांना १६ मे, १९५८ रोजी सेवेतून मुक्त केले. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये १९६० साली त्यांची पुन्हा तपासणी झाली. यात त्यांची वैद्यकीय अपात्रता २० टक्क्यांपेक्षा कमी करण्यात आली. परिणामी, ‘सैन्यात रुजू करता येणार नाही. वैद्यकीय पेन्शन बंद करण्यात येत असून, सेवा चार वर्षे असल्याने सेवा पेन्शन देता येत नाही,’ असे त्यांना कळविण्यात आले. १९६० पासून त्यांची वैद्यकीय पेन्शन बंद झाली. सैनिकीसेवेचे लाभ नामंजूर झाले.
१ जुलै, १९६० रोजी कांबळे यांचा फुलाबाई जाधव यांच्यासोबत विवाह झाला. दरम्यान १९९७ साली त्यांचे निधन झाले. फुलाबाई यांनी पतीच्या सैनिकसेवा समाप्तीनंतर म्हणजे ७२ वर्षांनी सर्वोच्च न्यायालय सरकारचा निर्णय आणि कार्यालय रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेन्शन) परिपत्रकानुसार, २५ एप्रिल, २०१४ रोजी न्यायाची मागणी केली. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले.थकबाकीही मिळणारपतीची पेन्शन मला द्यावी, अशी विनंती केली. यावर महार रेजिमेंट सीनियर रेकॉर्डर अधिकाऱ्यांनी लेखी कळविले की, या घटनेला ७० वर्षे झाली आहेत. सैन्यसेवा नियमानुसार कांबळे यांचे सर्व्हिस रेकॉर्ड नष्ट करण्यात आले आहे. परिणामी, माजी सैनिकाची पेन्शन देता येणार नाही. फुलाबाई यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांनतर, १५ जानेवारी, २०२० रोजी थकबाकीसह पेन्शन मंजूर करण्याची आॅर्डर मिळवून घेतली. यासाठी भारतीय माजी सैनिक लिग महाराष्ट्र राज्याचे सचिव हवालदार एम.जी. बिलेवार, मुंबई उपनगर माजी सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर मिनिल पाटील, सेवानिवृत्त मेजर राजेंद्र वळे यांची मदत झाली.