मुंबई, दि. 30 - १२ वर्षे आधी जेव्हा मुंबईत पाणी साचले होते त्या तुलनेत काल अगदीच कमी म्हणावा इतका पाऊस पडला. २६ जुलै २००५ च्या पावसापेक्षा काल फक्त २०% टक्के पाऊस झाला असं मी आज वाचलं. तरिही लोकांचे इतके हाल झाले हे आश्चर्यकारक आहे. प्रशासनाने त्या पुरातून काय धडा घेतला आहे याची प्रचिती सगळ्यांना आली. पण काल खरा फरक दिसला तो लोकांमध्ये आणि त्यांच्या हातात असलेल्या माध्यमामुळे. व्हाँटसअँप आणि मोबाइलमुळे कनेक्टीव्हीटी वाढली व लोकांनीच इतरांना मदतीचा हात पुढे केला. माझ्याकडे खाण्याची, राहण्याची व्यवस्था होऊ शकते असे संदेश लोक फेसबुकवरही आले. हा चांगला बदल दिसून आला पण हे सगळं लोकच करत होते तेही स्वतःहून. पण प्रशासन व राजकारण्यांनी अशावेळेस पुढच्या आघाडीवर येऊन लढायला हवं, लोकांना दिलासा दिला पाहिजे ते कोठेच दिसत नव्हतं, याचा अर्थ प्रशासनाशिवायच लोकांनी आपापले मार्ग काढले असं म्हणता येईल. एखादे काम केल्यावर त्याच्या कौतुकासह स्वामित्वही घेण्याची पद्धती आपल्याकडे यायला हवी. हा रस्ता मी तयार केला तर त्याची जबाबदारीही मी घेणार असं वाटायला हवं, त्यावर खड्डे पडता कामा नयेत, पडलेच तर ते लगेच भरले जातील अशी काळजी मी घेणार अशी वृत्ती काम करणार्यांमध्ये हवी. काम करणार्या प्रत्येकात जेव्हा ही भावना येईल तेव्हा उत्तरदायित्व नावाचा प्रकारही जागृत होईल. रस्ते बांधले की त्याखाली डेप्युटी इंजिनियरचे नावही टाकायला हवे म्हणजे एकप्रकारचा दबाव निर्माण होईल आणि आपोआपच कामात सुधारणा होत जाईल. हे काम मी केलंय म्हणजे त्याची पूर्ण जबाबदारी माझी, मी त्याचा मातापिता असं वाटलं पाहिजे. हेकेवळ रस्तेच नाही तर नालेसफाई वगैरे सर्व कामांना लागू आहे.
अन्यथा निवडणुकींच्या काळात केवळ हे करु , ते करु, मी हे केलं, ते केलं अशी भाषणे होतील पण प्रत्यक्षात जमिनीवर काहीच नसेल . मला काल मुंबईकरांनी एकमेकांना केलेली मदत पाहून खरंच समाधान वाटलं. गुरुद्वारा, मंदिरं, मशिदी, विद्यालयं यांनी कसलाही मागचापुढचा विचार न करता लोकांना आश्रय दिला, जेवू खाऊ घातलं. यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसला व त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. या मदत करणार्या लोकांना मनापासून नमस्कार आणि त्यांचे आभारही मानायला हवेत.