ऊर्जा संवर्धनासाठी ठोस योजना : वीज ग्राहकांना ‘डिजिटल पॉवर’ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:22 AM2018-12-28T05:22:12+5:302018-12-28T05:22:23+5:30

मुंबईकरांना कायमच ‘शॉक’ देत असलेल्या अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या वीज कंपन्यांनी नव्या वर्षात नवे संकल्प केले आहेत. नव्या संकल्पानुसार वीज ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सेवा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे.

 Solid scheme for energy conservation: Power consumers will get 'digital power' | ऊर्जा संवर्धनासाठी ठोस योजना : वीज ग्राहकांना ‘डिजिटल पॉवर’ मिळणार

ऊर्जा संवर्धनासाठी ठोस योजना : वीज ग्राहकांना ‘डिजिटल पॉवर’ मिळणार

Next

मुंबई : मुंबईकरांना कायमच ‘शॉक’ देत असलेल्या अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या वीज कंपन्यांनी नव्या वर्षात नवे संकल्प केले आहेत. नव्या संकल्पानुसार वीज ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सेवा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. ऊर्जा संवर्धनासाठी चारही वीज कंपन्यांनी पावले उचलली असून, हरित ऊर्जेवर भर दिला आहे. नव्या वर्षात वीज वाचावी, वीज ग्राहकांचा वेळ वाचवा यादृष्टीने उल्लेखनीय पावले उचलण्यात येणार आहेत. याच योजनांचा, उपक्रमांचा ‘आशा-अपेक्षा’ कॉलम अंतर्गत आढावा घेण्यात आला असून, नव्या वर्षात वीज ग्राहकांना ‘डिजिटल पॉवर’ मिळणार आहे.
बेस्टच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागतो. अशा वेळी हा वेळ वाचावा आणि वीजपुरवठा वेळेत पूर्ववत व्हावा यासाठी अद्ययावत यंत्रणा उभी
राहत आहे. या यंत्रणेमुळे नियंत्रण कक्षातून वीज बिघाड दुरुस्त केला जाईल. मीटर रीडिंग वेळेत घेता यावे, वीज ग्राहकांना व्यवस्थित विजेचे बिल मिळावे, त्रुटी दूर व्हाव्यात म्हणून स्मार्ट मीटर उपक्रम राबविण्यात येणार आहे. वीज ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अत्याधुनिक अशी ग्राहक सेवा केंद्रे प्रस्तावित आहेत. याद्वारे वीज ग्राहकांच्या समस्या आॅनलाइन सोडविल्या जातील. रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्यात येणार असून, याद्वारे ऊर्जा संवर्धनावर भर दिला जाणार आहे.
टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रविर सिन्हा यांनी सांगितले की, ई-हाउस, सेल्फ हेडिंग डिस्ट्रीब्युशन ग्रीड, सेफ्टी ट्रान्सफॉर्मर, इंटिग्रेटेड टेक्नोलॉजी इत्यादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. डिजिटल सेवांमध्ये अधिकाधिक वाढ केली जाणार आहे. अ‍ॅपबेस सर्व्हिस दिली जाणार आहे. आॅनलाइन भरणा भरता यावा; वीज सेवांसाठी ग्राहकांना अर्ज आॅनलाइन करता यावेत; म्हणून तंत्रज्ञान अद्ययावत केले जाईल. वीज सेवा खंडित झाल्यानंतर ती पूर्ववत करण्यापासून याची माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल. सोशल नेटवर्क साइटद्वारेही वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी चॅटबोट, खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी इंटरॅक्टिव्ह व्हाइस रिस्पॉन्स या प्रक्रियेवर भर देण्यात येणार आहे. ई-पेमेंट अंतर्गत भीम अ‍ॅप, भारत बिल पेमेंट सिस्टीम, डायनामिक भारत किंवा यूपीआय लिंक, डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ई-वॉलेट, आॅनलाइन फंड ट्रान्स्फर या सुविधा अधिक तत्परतेने देण्यात येतील. ‘सॅप’ प्रणाली, व्हाइस बोट इत्यादी सेवा वाढविण्यावर भर दिला जाईल. आॅल वूमन कस्टमर रिलेशन सेंटरला प्राधान्य देण्यात येत आहे.
ऊर्जासंवर्धन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, तो व्यापक करण्यात येणार आहे. वीज ग्राहक किती वीज वापरतो, त्याची माहिती त्याला आॅनलाइन मिळणार आहे. घरगुती ग्राहकांसह औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ग्राहकाभिमुख सेवा प्रदान केल्या जातील. अखंडित वीजपुरवठ्यासह मीटरसाठी विशेष योजना आखली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे वीज ग्राहकांना सुरक्षेबाबत जनजागृत केले जाईल.

सौर कृषी वाहिनी योजना स्थानिक पातळीवर राबविण्यात येईल. कृषीप्राबल्य असलेल्या वीस जिल्ह्यांतील सुमारे २१८ तालुक्यांत २ ते १० मेगावॅट इतक्या क्षमतेचे सौरप्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
सौर विद्युत संच, सौर पंप, सौर उष्णजल संयंत्र, सोलर स्टीम कुकिंग, बायोगॅसमधून विकेंद्रित वीजनिर्मिती इत्यादी प्रकल्पांना चालना देण्यात येईल.
महावितरण शेतकरी वर्गाला सौरऊर्जेवर आणून दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पाच हजार मेगावॅटपर्यंत सौरऊर्जा घेतली जाणार आहे.

एक हजार उपसा जलसिंचन योजना सोलर पार्कच्या माध्यमातून सौरऊर्जेवर आणल्या जातील. या योजनेमुळे किमान बारा तास सौरऊर्जा उपलब्ध होईल.

पवन ऊर्जा, सौरऊर्जा प्रकल्प, उभारण्याचे प्रस्तावित आहे. ‘ग्रीन एनर्जी कॉरिडोर योजना’ राबविण्यात येत आहे.
पन्नास विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे विविध शहरांमध्ये महावितरणच्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेत उभारण्यात येणार आहेत. विद्युत वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता राज्यात विविध ठिकाणी पाचशे विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्याची योजना आहे.
लघुदाब वाहिन्यांचे जाळे कमी करून त्या ठिकाणी उच्चदाब वीज वितरण प्रणाली उभारण्याचे विचाराधीन आहे.

Web Title:  Solid scheme for energy conservation: Power consumers will get 'digital power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.