‘सफाई कामगारांच्या कोरोना काळातील समस्या सोडवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 01:37 AM2020-06-17T01:37:30+5:302020-06-17T01:37:39+5:30
सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर
मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या मुंबईतील सफाई कामगारांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आमदार विजय (भाई) गिरकर यांनी नुकतीच महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची महापालिका मुख्यालयात भेट घेत सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले.
मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित कामगार आढळून येत असल्यामुळे सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करा. अनेक सफाई कामगारांच्या वसाहतीत सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्यामुळे सफाई कामगारांच्या वस्त्यांमध्ये प्रादुुर्भाव वाढत आहे. यामुळे सर्व वसाहती व त्यांच्या हजेरी चौक्यांवर दररोज निर्जंतुकीकरण करा. कोरोनाचा प्रादुुर्भाव रोखण्यासाठी संक्रमित सफाई कामगारांसाठी स्वतंत्र क्वारंटाइन सेंटर उभारा, सफाई कामगारांच्या कोरोना संक्रमणाबाबत स्वतंत्र प्रशासकीय अधिकाºयाची व प्रत्येक वॉर्डात एका संपर्क अधिकाºयाची नियुक्ती करा, कोरोना संक्रमित कामगारांसाठी रुग्णालयांमध्ये ५० राखीव खाटांची व्यवस्था करा, संक्रमित व क्वारंटाइन असलेल्या कामगाराला भरपगारी रजा द्या, केंद्र शासनाचा रु.५० लाखांचा विमा तसेच महापालिकेकडून ५० लाख असा १ कोटी रुपयाचा विमा घोषित करण्यात यावा. यासह अनेक मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
आयुक्तांनी दिले आश्वासन
सफाई कामगारांना भेडसावत असलेल्या सर्वच समस्यांचा अभ्यास करून त्या तातडीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिल्याची मााहिती आमदार विजय (भाई) गिरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.