लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा अन्यथा मराठा तरुणांबरोबर आम्हीही आंदोलनाला बसणार, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी दिला. आझाद मैदान येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या भेटीनंतर दरेकर बोलत होते. मराठा विद्यार्थ्यांचे महाविकास आघाडी सरकारला कसलेच सोयरसुतक नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची राज्य शासनाच्या विविध आस्थापनांत नियुक्ती झाली, पण अद्यापही त्यांना नेमणूक मिळाली नाही. एसईबीसीचे आरक्षण लागू करण्याची या विद्यार्थ्यांची मागणी आहे. एकीकडे या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित असतानाही सरकार रोज नवीन भरतीची घोषणा करत आहे. आरोग्य विभाग, गृह विभाग यांनी नवीन नोकरभरती जाहीर केली. याचा अर्थ सरकारच्या मनात पाप आहे. नवीन भरती करणार असाल तर मराठा आरक्षणाचे काय करणार, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे, असे दरेकर म्हणाले.
मराठा समाजाचा आक्रोश थांबला, त्यांची ताकद संपली, असा सरकारचा भ्रम आहे. त्यामुळे आंदोलनकारी युवांचा आवाज सरकारच्या कानावर पडत नाही. सरकारला या आंदोलनाची दखल घ्यायची गरज वाटत नाही. कायदेशीर लढाई चालू राहील. मात्र आता मराठा समजाला खेळवा-खेळवीचे राजकारण थांबवा. गरीब कुटुंबातील मराठी मुलांना मग कोणी एमएमआरडीची भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा अनेक आस्थापनांतील भरती असेल त्यात मराठा समाजाच्या पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ सामावून घेण्याची मागणी दरेकर यांनी केली.