मुंबई - ओला -उबेर चालकांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांना तत्काळ सोडवा, नाहीतर ओला-उबेर चालकांच्या कुटुंबीयांसहीत रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांनी सरकारला दिला आहे.ओला-उबेर चालकांच्या प्रदीर्घ काळापासून मागण्या बाकी आहेत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी १९ मार्चपासून या चालकांनी बेमुदत संपही केला होता. चालकांचे प्रश्न सुटावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने या संपाला पाठिंबाही दिला होता. मात्र, संपाच्या तीन दिवसांनंतर संपाची हाक दिलेल्या संघटनेने मालकांसोबत परस्पर वाटाघाटी करून, संप मागे घेतल्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात या ओला-उबेर चालकांच्या पदरात आश्वासनाशिवाय काही पडले नसल्याने, या चालकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. या सर्व कामगारांनी यावर लवकर मार्ग निघावा, यासाठी सचिन अहिर व राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ न, ओला-उबेर चालकांच्या प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले आणि या प्रश्नांचा तातडीने सरकारने तोडगा काढला नाही, तर आपण तीव्र आंदोलन करू, असा इशाराही दिला. सरकारबरोबरच ओला-उबेर कंपनीच्या व्यवस्थापनानेही या मागण्यांचा त्वरित विचार करावा, अन्यथा संघटना चालकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांवर या मालकांना न्यायालयात खेचेल, असा इशारा राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिला आहे. या वेळी युनियनच्या ओला-उबेर विभागाचे प्रमुख, सेक्रेटरी सुनील बोरकर, अनंत कुटे, प्रशांत सावर्डेकर, सुभाश साळुंखे, सुधीर भोसले आदींनी चर्चेत भाग घेतला.
ओला-उबेर चालकांचे प्रश्न सोडवा; रस्त्यावर उतरून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 5:42 AM