Join us

बूट पॉलिश कामगारांच्‍या समस्‍या सोडवा; खा. गजानन कीर्तिकर यांचं केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्र्यांना निवेदन

By मनोहर कुंभेजकर | Published: March 24, 2023 3:46 PM

या निविदेतील रक्‍कम भरणे या गरीब बूट पॉलिश कर्मचा-यांना शक्‍य नाही म्‍हणून ही निविदा रद्द करण्‍यात यावी

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्‍याण जंक्‍शन या दरम्‍यानच्‍या प्‍लॅटफार्मवर सुमारे १५० बूट पॉलिश कर्मचारी गेल्‍या ५० वर्षापासून कार्यरत आहेत. दरमहा या कर्मचा-यांना रूपये ५०० इतके भाडे रेल्‍वे खात्‍याकडे भरावे लागत असून यामध्‍ये दरवर्षी सहा टक्‍के वाढ करण्‍यात येते. सन २००६ पूर्वीचे जे बूट पॉलिश कर्मचारी आहेत, त्‍यांचे परवाने नुतनीकरण करण्‍यात यावे असे निर्देश रेल्‍वे बोर्डाने दि. १७ मार्च २०२३ रोजी देऊन नव्‍याने निविदा मागविल्‍या आहेत.

या निविदेतील रक्‍कम भरणे या गरीब बूट पॉलिश कर्मचा-यांना शक्‍य नाही म्‍हणून ही निविदा रद्द करण्‍यात यावी, या मागणीसाठी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. 

यावेळी मंत्री महोदयांनी रेल्‍वे बोर्डाच्‍या अध्‍यक्षांना तात्‍काळ सदर निविदा रद्द करणेबाबतच्‍या सूचना दिल्‍या अशी माहिती खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली. यावेळी बूट पॉलिश कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे समन्‍वयक दयाकिशोर भारती, रविदास संस्‍थेचे सचिव रामबवन राम आणि धानक बूट पॉलिश कामगार संस्‍थेचे सदस्‍य ब्रिजलाल राम उपस्थित होते.