मुंबई : सध्या राज्याच्या सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सीईटी सेलकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी आता थेट सेतू केंद्रातील उपस्थित अधिकाऱ्यांशी आपल्या समस्यांविषयी चर्चा करून त्या सोडवू शकतात.सध्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची कागदपत्रांची छाननी प्रक्रिया सीईटी सेलकडून सुरू आहे. दरम्यान, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यासाठी संबंधित प्राधिकरणाशी मदतीसाठी पत्रव्यवहार करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी असलेल्या सेतू केंद्रांशी संपर्क साधण्यासाठीही कधी कधी विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असल्याचे समोर आले आहे. तिथेही त्यांच्या समस्येचे निराकरण झाले नाही, तर त्यांना सीईटी सेल किंवा तंत्रशिक्षण संचालनालयाकडे धाव घ्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रियेतील समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.राज्यातल्या १२ सेतू केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांच्या समस्या सोडविल्या जात आहेत. या केंद्रांवरील अधिकारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत असून त्यांच्या समस्या सोडवत असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. या वर्षी सर्व प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनासाठी सक्षम आणि अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.अडचणींची माहिती घेऊन पुरवली सुविधागेल्या वर्षी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना ही परीक्षा देताना कोणत्या अडचणी आल्या, याची माहिती घेतल्यानंतर कागदपत्रे जमा करताना अडचणी आल्याचे समोर आले. यावर उपाय म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याचे सीईटी सेल कक्षाचे संचालक आनंद रायते यांनी सांगितले. वैद्यकीय प्रमाणेच अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांना आलेल्या समस्येचे निरसन करण्यासाठी राज्यभरात सेतू केंद्रांवरून कॉन्फरन्सची सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली.
विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 6:29 AM