मुंबई :
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी किरीट व निल सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली होती. ट्रॉम्बे पोलिसांनी बजावलेल्या समन्सला ते शनिवारी गैरहजर राहिले होते. दाखल गुन्ह्यातील रक्कम जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहाना शेख यांनी तपास वर्ग केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सर्व कागदपत्रे, पुरावे आर्थिक गुन्हे शाखेकडे दिले आहेत.