मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी ठाकरे सरकारविरोधात घोटाळ्याचे आरोप केले. दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा लाभ घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचे सोमया म्हणाले.
सोमय्या यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ठाकरे आणि नाईक कुटुंबीय यांच्यातील जमीन व्यवहाराचे आणखी नऊ सातबारा उतारे सादर केले. ठाकरे कुटुंबाने आतापर्यंत जमिनीचे ४० व्यवहार केले असून त्यापैकी ३० व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी केला. तर, दहिसर येथे भूखंड घोटाळा झाल्याचाही आरोप केला.
अजमेरा बिल्डर्सने २ कोटी ५५ लाखांना विकत घेतलेल्या जमिनीसाठी आता मुंबई महापालिकेला ९०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या व्यवहारासाठीचे ३०० कोटी रुपये अजमेरा बिल्डर्सला यापूर्वीच दिले गेले. आता संजय राऊत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये हिंमत असेल तर या आरोपांवर उत्तर द्यावे, असे आव्हान सोमैया यांनी दिले.
सोमया यांच्या आरोपांचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला. सोमय्या यांनी जमीन व्यवहाराबाबत केले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांनी ईडीच्या चौकशीची मागणी केली आहे. या व्यापाऱ्यांना, त्यांच्या दलालांना, आम्ही २५ वर्षे घरी बसवू, असे संजय राऊत म्हणाले. आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय देण्याची आहे. मात्र शेठजींच्या पक्षातील लोकांना गुन्हेगारांना वाचवायचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.