Join us

सोमैय्यांचा केविलवाणा 'तमाशा' सुरूय, राष्ट्रवादीच्या आमदाराची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 8:43 AM

कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणे पाच वाजता किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कऱ्हाड येथे उतरले आहेत.

ठळक मुद्देप्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी कऱ्हाडला उतरत आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच, सोमैया यांनी यासंदर्भात ट्विटसुद्धा केले आहे.

मुंबई - भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच सामना रंगल्याचं दिसून येत आहे. कोल्हापूरकडे रवाना झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना कऱ्हाडमध्येच उतरवण्यात आले. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणे पाच वाजता किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कऱ्हाड येथे उतरले आहेत. किरीट सोमैय्यांच्या या कोल्हापूर दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 

प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी कऱ्हाडला उतरत आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच, सोमैया यांनी यासंदर्भात ट्विटसुद्धा केले आहे. आज सोमवारी सकाळी नऊ वाजता कराडमधील शासकीय विश्रामधाम येथे त्यांची पत्रकार परिषद आहे. तिथे ते काय बोलतात याबद्दल सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, सोमैय्यांच्या या दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून भाजपसह सोमैय्यांवर टीकास्त्र सोडत आहेत.

आमदार अमोल मिटकरी यांनीही सोमैय्यांचा हा दौरा म्हणजे केविलवाणा तमाशा असल्याचं म्हटलं आहे. 

हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. तसेच, किरीट सोमय्या हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यातील कापशी खोऱ्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची चौकशी करण्यासाठी कोल्हापूरला येणार होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाबंदी केली. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना कऱ्हाडमध्ये उतरवण्यात आले.

जिल्हाबंदीचे आदेश

कोल्हापुर जिल्ह्यात 144 कलम लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 20 सप्टेंबरला पहाटे 5 ते 21 सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. किरीट सोमय्यांना सुद्धा याबद्दल नोटीस बजावली.  

टॅग्स :किरीट सोमय्याराष्ट्रवादी काँग्रेस