मुंबई : देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात यावे, ही शिवसेनेची भूमिका आहे. भाजपा खासदार किरीट सोमय्या मात्र, मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंडचा प्लॉट आकृती बिल्डर्सला मिळावा, यासाठी वारंवार प्रयत्न करीत आहेत. ब्लॅकमेलिंग हाच त्यांचा धंदा आहे, असा थेट आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला. मुलुंड डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला आकृती डेव्हलपर्स आणि बिल्डरचे प्रकल्प आहेत. त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. देवनार व मुलुंड डम्पिंग ग्राउंडचे काम भाजपा खासदार संजय काकडे आणि जय श्रॉफ यांच्या यूपीएल कंपनीकडे आहे. संजय काकडे यांच्यावरसुद्धा घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. पुढे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांना भाजपा प्रवेश देण्यात आला आणि राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. जय श्रॉफ या कंत्राटदारावर किरीट सोमय्या यांनी कचरा घोटाळ्याचा आरोप केला. मात्र, याच जय श्रॉफसोबत भाजपा नेते कार्यक्रम करतात. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार हे यूपीएलला मदत करतात. या कंपनीचे पैसे मिळावेत, यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे बैठकदेखील घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर देवनार डम्पिंग ग्राउंडला ज्या आगी लागतात, त्या संशयास्पद असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी ऐरोली आणि तळोजा येथे नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी मुंबई महापालिकेला जागा पाहिजे, ही जागा मुख्यमंत्री देत नाहीयेत. मुख्यमंत्र्यांनी २१ फेब्रुवारीपर्यंत ऐरोली आणि तळोजा डम्पिंग ग्राउंडची जागा मुंबई महापालिकेला द्यावी, नाहीतर मुंबईतील डम्पिंग ग्राउंडबद्दलच्या सर्व तक्रारींची जबाबदारी भाजपाने घ्यावी, असे राहुल शेवाळे म्हणाले. किरीट सोमय्या यांनी यापूर्वी टँकर घोटाळ्याचा आरोप केला. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात शिवाजीनगरमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी सोमय्या यांची पत्रे आहेत. त्यांच्या सह्यांनी पत्रे पुढे पाठवण्यात आली. अवघ्या दीडशे रुपयांचे टँकर्स ७०० ते ८०० रुपयांना विकले जात आहेत. कचरा घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप झाला, त्यांच्याकडून भाजपाच्या कार्यक्रमांना निधी मिळाल्याचा आरोप आहे. शिवाय सोमय्या यांनी मिठी नदी आणि माहुल गावातील अनधिकृत बांधकामाबाबत याचिका दाखल केली. मात्र, त्याचे पुढे काय झाले, कोणालाच काही माहिती मिळाली नाही. केवळ आरोप करायचे आणि ब्लॅकमेलिंग करायचे, इतकाच धंदा सोमय्या यांनी चालविला आहे, असा आरोपही शेवाळे यांनी केला. (प्रतिनिधी)
सोमय्यांचा ब्लॅकमेलिंगचा धंदा
By admin | Published: February 07, 2017 4:33 AM