मुंबई: विधानसभेतील शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील हा वाद आता विधानभवनात पोहोचला. दोन्ही बाजूंनी कायदेशीर डावपेच सुरु झाले आहेत. त्यात उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या भूमिककडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन्ही बाजूंनी निष्णात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असून उद्या उपाध्यक्षांनी काहीही निर्णय दिला तरी त्याविरुद्ध हायकोर्टात व पुढे सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाईल हे स्पष्ट आहे. बंडखोर गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला. आपण घेत असलेल्या कायदेबाह्य निर्णयांमुळे आपल्यावर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे हा प्रस्ताव आणल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे गटातील ज्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. त्यांना लवकरच नोटीस पाठवल्या जाणार आहेत. एकेका आमदाराला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल व त्यानंतर उपाध्यक्ष निर्णय घेतील, असे समजते. या अपात्रतेसंदर्भात उद्योग मंत्री सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत, खा. अनिल देसाई, आ. सुनील प्रभू हे नरहरी झिरवळ यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा करीत होते. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे यावेळी उपस्थित होते.
ठाकरे-पवार यांच्यात चर्चा-
कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार पुढील अडीच वर्षदेखील चालवायचे, त्यासाठी सध्याच्या संकटातून कसा मार्ग काढायचा या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ‘मातोश्री’वर सायंकाळी एक तास चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. संकटावर मात करण्यासाठीच्या रणनीतीवर ठाकरे-पवार यांच्यात चर्चा झाली. पुढील काही दिवस कायदेशीर लढाई लढावी लागेल, याचीही चर्चा झाली.