Join us  

महाराष्ट्र काँग्रेसमधील आमदारांचा गट फुटण्याची शक्यता; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 12:20 PM

राज्यात पुन्हा एकदा राजकारण वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 मुंबई- एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी एक वेगळा गट स्थापन करत शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का दिला. या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजकीय सत्तासंघर्ष शिगेला गेला अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

सदर राजकीय घडामोडींना दोन महिनेच उलटले असताना राज्यात पुन्हा एकदा राजकारण वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेनंतर आता महाराष्ट्रकाँग्रेसमधील काही माजी मंत्री आणि आमदार फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच येत्या ऑक्टोबर महिन्यात शिंदे-फडणवीस  मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची काही मतं फुटली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं २, राष्ट्रवादीने २ आणि शिवसेनेने २ उमेदवार उभे केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटली. काँग्रेसच्या २ उमेदवारांपैकी एकाला पराभव सहन करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची हक्काची मते फुटली. त्यामुळे याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली होती. 

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांची यादी पक्षश्रेष्ठीला देण्यात आली आहे. आमदारांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील १, मराठवाड्यातील २-३ आणि मुंबईतील २ आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे. या आमदारांनी विधान परिषदेत भाजपाला मतदान केले होते. त्यामुळे भाजपाच्या ५ व्या उमेदवाराचा विजय सोपा झाला होता. विधान परिषदेत भाजपाचे प्रसाद लाड यांचा अटीतटीच्या लढतीत विजय झाला होता. त्यानंतर काँग्रेसमधील मते फुटीची दखल घेत अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकमांडनं दिले होते. त्यावर आता अहवाल तयार होऊन तो दिल्लीलाही पाठवला होता.

टॅग्स :काँग्रेसमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदे