मुंबई- राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे.
पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली. संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे.
रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर
संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. अपक्ष उमेदवारांनी आम्हाला शब्द देऊन मतदान केलं नाही. सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच संजय पवार यांच्या पराभवानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपाने काल जो घोडेबाजार केला, तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, असं संजय राऊत म्हणाले. तसेच बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमान पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत, ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
'वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा'; राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया
दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकून भाजपने विजय मिळविल्याची टीका केली आहे. भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. भाजपने माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?" असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.