काही लोकांनी विश्वासघात केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:08 AM2023-01-20T06:08:43+5:302023-01-20T06:09:09+5:30
केंद्र सरकारने दिलेल्या भरीव निधीबद्दल मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधानांना हात जोडून अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून २०१९ मध्ये बहुमत दिले होते. पण काही लोकांनी विश्वासघात केला. अलीकडे मोदीजींच्या आशीर्वादाने ते सरकार गेले आणि आता विकास करणारे सरकार आले असून मुंबई, महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले की, मोदी हे जगात लोकप्रिय आहेत पण त्यांच्या लोकप्रियतेची स्पर्धा घेतली तर मुंबई क्रमांक एकवर असेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे यांचे सच्चे अनुयायी असलेले एकनाथ शिंदे यांनी हिंमत दाखविली, मोदीजींनी आशीर्वाद दिला आणि लोकांच्या मनातील सरकार आले आणि ते गतीने विकास करत आहे.
पंतप्रधान स्वनिधी योजनेतून आज मुंबईतील एक लाखावर फेरीवाले, छोट्या व्यावसायिकांना अर्थसाहाय्य मिळत आहे. आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन ही योजना स्थगित केली होती. आमच्या सरकारने आज १ लाख १५ हजार फेरीवाल्यांना लाभ दिला आहे. राज्यात इतर ठिकाणीही तो दिला जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना अभिवादन केले. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने दिलेल्या भरीव निधीबद्दल मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधानांना हात जोडून अभिवादन केले.
आधीच्या सरकारने प्रकल्प रखडवले
मुंबईतील एसटीपी प्रकल्प आधीच्या सरकारमध्ये रखडवले गेले, कारण संबंधितांना त्यांचा हिस्सा मिळत नव्हता, या शब्दात ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्तारूढ शिवसेनेवर फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले की, मुंबईत त्यावेळी बनविलेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांमध्ये खालची लेअरच गायब होती, हे रस्ते परीक्षण करताना आढळले. वारंवार त्याच त्या रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात होते. आम्ही सिमेंट रस्ते बांधण्याचा निर्णय घेऊन ते सगळे थांबविले.
धारावी प्रकल्पाची उभारणी लवकरच
मोदी यांनी देशात आणलेली पारदर्शक कार्यसंस्कृती आम्ही आणली आहे. मुंबईच्या विकासासाठी आम्हाला मोदीजींचा आशीर्वाद हवा आहे. मुंबईकरांनाही तो हवा आहे. लवकरच धारावी पुनर्विकास प्रकल्पाची उभारणी केली जाईल. एक लाख लोकांना घरे देणारी ही जगातील सर्वात मोठी योजना असेल असे फडणवीस म्हणाले.