Join us

काही लोक आंदोलनाचा फायदा घेऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतायत; शिसराट यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 1:45 PM

मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई: सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आपण स्थगित केलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचे रुपांतर आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणात करत आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. 

मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत.म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. या आमरण उपोषणात आपण अन्न-पाणी आणि कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदालेनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन प्रामाणिकपणे सुरु आहे. परंतु काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहेत, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे, यासाठी आपला लढा सुरू आहे. परंतु, आत्महत्या होत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तसेच नेतेमंडळींना गावबंदी करा, कायदा हातात घेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. एकूणच आजवर एकाही आश्वासनाची पूर्तता शासनाकडून झालेली नाही. यामुळे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जात आहे. 

शिवरायांची शपथ...मराठा आरक्षण देणारच!

शिवरायांची शपथ...मराठा आरक्षण देणारच. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला आश्वस्त केले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावर  मंगळवारी पार पडला. मी देखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे, मला त्यांचे दुःख, वेदना कळतात. कोणावरही अन्याय न करता, कुणाचेही न काढून घेता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

टॅग्स :मराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलसंजय शिरसाट