मुंबई - माजीमंत्री संजय देशमुख आणि काँग्रेसचे माजी नगरेसवक संजय घाडीगावर यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेनेत) जाहीर प्रवेश केला. यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढली असून ते मंत्री संजय राठोड यांना आव्हान ठरणार आहे. मातोश्री निवासस्थानावर या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह, भाजप आणि मनसेलाही टोला लगावला. काहीजण विनंती करा म्हणून विनंती करत फिरत होते, असे म्हणत भाजपच्या पोटनिवडणुकीतील माघारीवर सडेतोड टीका केली.
संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली आहे. मी पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा. मी आलोच, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. माझे काय होणार, शिवसेनेचे काय होणार? हे ठरवणारे तुम्ही आहात. मला त्याची चिंता नाही. मात्र देशाचे काय होणार? देशात लोकशाही राहणार आहे की नाही? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे, असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. त्यासोबतच, सत्ताधारी शिंदे गट, भाजपा आणि मनसेवरही टीका केली. काहीजण विनंती करा म्हणून विनंती करत फिरत होते, मग कोणाला तरी उभं केलं आणि विनंती करुन घेतली, असे म्हणत राज ठाकरेंवरही निशाणा साधला. यावेळी, उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
ढुंगणावर आपटण्यापेक्षा पळालेलं बरं म्हणून ते पळाले, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पोटनिवडणुकीत भाजपने घेतलेल्या माघारीनंतर प्रतिक्रिया दिली. तसेच, निवडणूक लढवायचीच नव्हती, मग माझं नाव आणि चन्ह गोठवण्याची घाई का केली, असं नेमकं काय घडलं. ज्यामुळे नाव आणि चिन्ह गोठविण्यात आलं, हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे, असेही उद्धव ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांना म्हटले. आपण उलटी गणती नाही करायची, आपण १,२,३,४, ५ असंच करायचं. मुळात आपण कोर्टात अपात्रतेसंदर्भात खटला दाखल केला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय नाही. ते या इकडून तिकडं असा चेंडू टाकला जातोय. ज्या तत्परतेनं चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय झाला, त्याची काहीही गरज नव्हती. याचा अर्थ त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिवसेना संपवायची आहे, असा आरोपही भाजपचे नाव न घेता केला.