मुंबई - येत्या दोन महिन्यांत सर्व मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी प्रत्येक वॉर्डात एक असे २२७ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. मात्र पालिकेच्या खर्चातून उभ्या राहिलेल्या लसीकरण केंद्राचे श्रेय काही लोकप्रतिनिधी घेत असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली असून अशा जाहिराती तात्काळ काढून टाकण्याची आवाहन त्यांनी लोकप्रतिनिधींना केले आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक लोकांना लस मिळाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेपूर्वी मुंबईतील लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक लाख लस खरेदीसाठी जागतिक निविदाही मागविण्यात आल्या आहेत. तर शासकीय व महापालिका केंद्राव्यतिरिक्त आणखी काही विभागवार लसीकरण केंद्र सुरु केली जात आहेत.
प्रभागात सुरू करण्यात येणाऱ्या नवीन लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचा सपाटा नगरसेवकांनी लावला आहे. तर अनेकांनी ही केंद्रे आपण सुरू केली असल्याची फलकबाजी केली आहे. त्यांच्या पक्षाने ही केंद्र सुरू केले असल्याचा दावा काही लोकप्रतिनिधी करीत आहेत. अशा अनेक तक्रारी आल्याने अशा जाहिराती सौजन्य धरून नसल्याची नाराजी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केली आहे. अशा जाहिराती काढून टाकण्याची विनंती संबंधित लोकप्रतिनिधींना करावी, असे निर्देश त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.