बडवे पक्षाचे वाटोळे करताहेत, म्हणून आम्ही बाहेर पडलो...- मंत्री छगन भुजबळ
साहेब आमचे विठ्ठल आहेत, पण त्यांना बडव्यांनी घेरले आहे. त्यांनी या बडव्यांना दूर सारावे. भाजपसोबत गेल्याबद्दल आम्हाला आशीर्वाद द्यावेत. पक्षामध्ये अनेकांना अपमानित करायचे, नियुक्त्या करायच्या नाहीत असेच सुरू होते. हे बडवे पक्षाचे वाटोळे करायला निघाले म्हणून आम्ही बाहेर पडलो. नागालँडमध्ये सात आमदारांना भाजपच्या मंत्रिमंडळात जाण्यासाठी आपण आशीर्वाद दिले, तसेच आम्हालाही द्या. तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्हाला पोटाशी धरा, वाटल्यास कान धरा, पण तुमच्याभोवती पसरलेला धूर दूर करा. सगळा पक्ष अजितदादांच्या नेतृत्वात एकवटला असताना आमचा तिरस्कार नाही तर सत्कार करा. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील हे लोक सोडून गेले तेव्हा साहेबांच्या डोळ्यात पाणी आले म्हणतात. मग वसंतदादांना साहेबांनी सोडले तेव्हा वसंतदादांच्या डोळ्यातही पाणी आले असेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब यांना सोडून मी तुमच्यासोबत आलो तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी आले असेल, धनंजय मुंडे तुमच्यासोबत गेले तेव्हा गोपीनाथ मुंडे, पंकजा यांच्या डोळ्यातही पाणी आले असेल. त्याची पुनरावृत्ती आज झाली.
पुस्तक लिहिण्याची वेळ येईल तेव्हा बरेच काही समजेल...- खासदार प्रफुल्ल पटेल
मलाही पुस्तक लिहिण्याची वेळ येईल तेव्हा या महाराष्ट्राला बरेच काही समजेल. वेळ येऊ द्या, मग मी काय तो खुलासा करीन. अजितदादांना बदनाम करण्याचा कट किती चुकीचा आहे, हे आरोप करणाऱ्यांनाही ठाऊक आहे. २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार पडणार होते तेव्हा पक्षाच्या सर्व आमदारांनी भाजपसोबत जाण्याची विनंती साहेबांना केली होती. शिवसेनेला तुम्ही मिठी मारू शकता तर भाजपला का नाही? आम्ही सत्तेसाठी नाही, तर विकासासाठी नवा ध्यास घेतला आहे.
आपला मुख्यमंत्री असता, पण काहींनी अंग चोरुन काम केले- खासदार सुनील तटकरे
राष्ट्रवादीला २००४ मध्ये मिळाल्या त्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या; पण सर्वांनीच ताकद लावली असती तर १०० पेक्षा जागा तेव्हाच मिळाल्या असत्या आणि आपला मुख्यमंत्री झाला असता; परंतु काहींनी अंग चोरून काम केले. अजितदादांनी बेधडकपणे विरोधकांच्या अंगावर जाण्याची भूमिका घेतली. मी राज्यात सत्तेवर बसलो असेन तर कार्यकर्त्यांमुळे; मग सत्तेत असताना त्यांना शक्ती दिलीच पाहिजे, असा विचार करणाऱ्या या नेत्याच्या नेतृत्वात आता सगळे एकत्र आले आहेत.
मी कच्च्या गुरूचा चेला नाही- मंत्री धनंजय मुंडे
पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत. या आधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखविला होता, तसाच कार्यक्रम आम्हीही केला. शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही. घरात फूट पडणे, त्यातून होणाऱ्या मानसिक वेदना यातून मी स्वत: या आधी गेलो आहे. मला त्याची जाणीवदेखील आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली, याचाही विचार केला गेला पाहिजे. शरद पवार आमचे विठ्ठल आहेत; पण त्यांना तीन बडव्यांनी घेरले आहे. त्यांनी अजितदादांची बदनामी केली.
आमचे शब्दही तलवारीसारखे- रुपाली चाकणकर
अजित पवार हे शब्दाला जागणारे नेते आहेत. पाहतो, बघतो असे म्हणत ते कोणाला हेलपाटे मारायला लावत नाहीत. आमचा पक्षातील कोणाशी संघर्ष नाही; पण कोणी आम्हाला बोलायला लावले तर आमच्याही शब्दांना तलवारीची धार आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही सगळे अजितदादांसोबत आहोत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला हटविले ही सल मला दीड वर्षापासून होती. आता हे पद परत मिळाल्याने ती दूर झाली.