Join us

मुद्रांक शुल्काच्या आकारणीमुळे घर खरेदीत काही प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:06 AM

मुंबई : ३१ मार्च रोजी मुद्रांक शुल्कात देण्यात आलेली सवलतीची मुदत संपल्याने १ एप्रिलपासून नागरिकांना घर खरेदीवर पाच टक्के ...

मुंबई : ३१ मार्च रोजी मुद्रांक शुल्कात देण्यात आलेली सवलतीची मुदत संपल्याने १ एप्रिलपासून नागरिकांना घर खरेदीवर पाच टक्के मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक झाले आहे. मात्र यामुळे मुंबईतील घर खरेदी काही प्रमाणात घटल्याचे चित्र दिसून येत आहे.

१ एप्रिल रोजी मुंबई ५४४ घरांची खरेदी झाली. ३१ मार्च रोजी मुद्रांक शुल्क सवलतीचा शेवटचा दिवस असल्याने त्यादिवशी ७८७ घरांची खरेदी झाली होती. त्यामुळे १ एप्रिल रोजी झालेली घर खरेदी २४३ ने कमी होती. राज्यातील बांधकाम व्यवसाय कोरोनानंतर पुन्हा एकदा रुळावर येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली होती. त्यामुळे १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान तीन टक्के सवलत. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान मुद्रांक शुल्कावर दोन टक्के सवलत देण्यात आली. यामुळे मुंबईत घर खरेदीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

या सवलतीच्या कालावधीत सर्वात जास्त घर खरेदी डिसेंबर आणि मार्च महिन्यात झाली. डिसेंबर महिन्यात मुंबईत १९ हजारांहून जास्त तर मार्च महिन्यात १७ हजाराहून जास्त घर खरेदी झाली. त्यामुळे सवलतीचा कालावधी २०२२ पर्यंत वाढविण्याची मागणी रियल इस्टेट क्षेत्रातून होऊ लागली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी घर खरेदीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.