Join us

विधि अभ्यासक्रमाचे काही निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 5:15 AM

मुंबई विद्यापीठाच्या विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार परीक्षा व मूल्यमापन विभागाने शुक्रवारी एकूण आठ परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार परीक्षा व मूल्यमापन विभागाने शुक्रवारी एकूण आठ परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. यातील काही परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असून, त्याचे सविस्तर वेळापत्रक परीक्षा विभागाने वेबसाईटवर जाहीर केले आहे.विधि अभ्यासक्रमाचे काही निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यात नोव्हेंबरमध्ये एलएलबी सेमिस्टर सहा, एलएलबी सेमिस्टरच्या चारच्या एटीकेटी परीक्षेचे निकाल जाहीर झाले. बॅचलर आॅफ लॉ (एलएलबी)चे सेमिस्टर ६साठी १७२६ जणांनी परीक्षेचा अर्ज केला होता. त्यापैकी ११७२ जण परीक्षेला बसले होते. या परीक्षेत फक्त ५४६ जण उत्तीर्ण झाले असून, ६०६ जण अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच बॅचलर आॅफ लॉ (एलएलबी)च्या सेमिस्टर ४च्या परीक्षेसाठी १९०३ जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी १५०७ जण परीक्षेला बसले होते. या परीक्षेत फक्त ८९१ जण उत्तीर्ण झाले असून, ६१६ जण अनुत्तीर्ण झाले आहेत. मास्टर आॅफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३च्या परीक्षेसाठी ४४२ जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी ३६१ जण परीक्षेला बसले होते. या परीक्षेत फक्त ७१ जण उत्तीर्ण झाले असून, २०१ जण अनुत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे जानेवारीत झालेल्या हिवाळी परीक्षांचे एलएलएम सत्र ३, एलएलएम सत्र८ आणि एलएलएम सत्र १०चे निकालही जाहीर करण्यात आल्याचे परीक्षा विभागाने जाहीर केले आहे.विद्यापीठाने एलएलबी सेमिस्टर १, पाच वर्षीय लॉ अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर पाच, एलएलबी सेमिस्टर पाच यांसारख्या इतर विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यातील जवळपास सर्वच परीक्षा आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.>‘त्या’ विद्यार्थ्याला झाली अटकमुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाला कंटाळून विधि अभ्यासक्रमाच्या अभिषेक सावंत या विद्यार्थ्याने १४ एप्रिल रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याची गंभीर दखल घेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी शुक्रवारी सकाळीच त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर १५१ कलाम लावण्यात आले. त्याला १४ तारखेला दुपारी सोडण्यात येणार असल्याचे समजते.