Join us

नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिरकडे पाठ; १ जानेवारीपासून २३ नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय

By संजय घावरे | Published: December 24, 2023 12:28 AM

सोयी-सुविधांचा अभाव असूनही श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टने निर्मात्यांवर जाचक नियम लादल्याच्या विरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने हे एक प्रकारचे बंड पुकारले आहे.

मुंबई - १ जानेवारी २०२४ श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये आपल्या मराठी नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय काही नाट्य निर्मात्यांनी घेतल्याने नाट्यसृष्टीत खळबळ उडाली आहे. सोयी-सुविधांचा अभाव असूनही श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टने निर्मात्यांवर जाचक नियम लादल्याच्या विरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने हे एक प्रकारचे बंड पुकारले आहे.

'व्हॅक्यूम क्लीनर', 'संज्या छाया', 'नियम व अटी लागू', 'सारखं काहीतरी होतंय', 'एका लग्नाची पुढची गोष्ट', 'आपण यांना पाहिलंत का?', 'संकर्षण आणि स्पृहा', 'वऱ्हाड निघालंय लंडनला', 'खरं खरं सांग!', 'जर तरची गोष्ट', 'मर्डरवाले कुलकर्णी', '३८ कृष्ण व्हिला', 'हिच तर फॅमिलीची गंमत आहे', 'चारचौघी', 'दादा एक गुड न्यूज आहे', 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला', 'प्रिय भाई', 'काळी राणी', 'अ परफेक्ट मर्डर', 'वाडा चिरेबंदी', 'सफरचंद', 'तू म्हणशील तसं' आणि 'गालिब' ही २३ नाटके १ जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये होणार नसल्याचे निर्मात्यांनी जाहिर केले आहे. मागील काही दिवसांपासून नाट्य निर्माते आणि ट्रस्टमध्ये बरीच खलबते सुरू होती. त्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने शिवाजीमध्ये नाट्य प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने तिकिट दर, पार्किंग आणि इतर सोयी सुविधांचे मुद्दे ऐरणीवर आहेत. ७ डिसेंबर २०२३ रोजी ट्रस्टने मराठी व्यावसायिक नाट्य निर्मात्यांना पत्र पाठवून नाट्यगृहाच्या भाडे दरात बदल करण्यात आल्याचे सांगितले होते. मनपाच्या नाट्यगृहांप्रमाणे शिवाजीमध्येही भाड्यात सवलत मिळावी अशी नाट्य निर्मात्यांची मागणी ट्रस्टने मान्य केली होती. त्यानुसार ४०० रुपयांपर्यंत तिकिट असेल तर २५ टक्के सवलत देण्यात आली होती, पण ५०० रुपये तिकिट केल्यास नाट्यगृहाचे पूर्ण भाडे आकारले जाईल असे पत्रात नमूद करण्यात आले होते. १ डिसेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. काही निर्मात्यांनी यावर आक्षेप घेत प्रयोग न करण्याची भूमिका घेतली आहे.

याबाबत अष्टविनायकचे दिलीप जाधव म्हणाले की, ट्रस्टमध्ये नवीन व्यक्तींची नेमणूक झाल्यापासून तारखांचा घोळ सुरू आहे. ठराविक निर्मात्यांनाच शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या तारखा देत पक्षपात केला जातो. ५०० रुपये खर्चून आलेल्या प्रेक्षकांना सोयी-सुविधा देण्याऐवजी व्यवस्थापन निर्मात्यांकडून पैसे उकळण्याच्या मागे आहे. पार्किंगची सोय उत्तम नसल्याने तिथे नाटक करणे आणि पाहाणेही जिकीरीचे झाले आहे.

इतर नाट्यगृहांमध्ये ५०० रुपयांपर्यंत तिकिट लावण्याची परवानगी आहे. शिवाजी मंदिरमध्ये मात्र नाही. ट्रस्टी आणि व्यवस्थापनाच्या वागण्यात अरेरावीपणाची जाणवत असल्यानेही जानेवारीपासून प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला असून, प्रेक्षकांना समजायला हवे यासाठी जाहिरात केल्याचे एका निर्मात्याचे म्हणणे आहे. यात नाट्यधर्मीचे १३-१४ निर्मात्यांचा समावेश आहे.निर्माते-ट्रस्टमध्ये ताळमेळाचा अभावट्रस्टच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी नाट्यगृहाचे भाडे ३०००० रुपये होते. सध्या सवलीनुसार भाडे १३००० रुपये आहे. ५०० रुपये तिकिट केल्यास १७००० रुपये भाडे आकारले जाते. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार सध्या १८००० हजार रुपये भाडे असून, ५०० रुपये तिकिट केल्यास दीड पट म्हणजे २७००० रुपये भाडे घेतले जाते.- चंद्रकांत लोकरे (निर्माते, खजिनदार, जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ)ट्रस्टशी पत्र व्यवहार केल्यानंतर त्यांनी दीड पट भाडे आकारले जाईल असे कळवले. प्रेक्षकांच्या दृष्टीने आवश्यक सोयी तिथे नाहीत. वाढलेल्या खर्चानुसार ५०० रुपये तिकिट दर करणे ही काळाची गरज असल्याने निर्मात्यांना शिवाजी मंदिर परवडत नाही. पार्किंगची सोय नाही. प्रत्येक प्रयोगाला ३०-४० गाड्या येतात. वॅले पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचाही सल्ला दिला होता, पण काही उपयोग नाही.- मेजर सुधीर सावंत (अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट)सर्व निर्मात्यांना शनिवार-रविवारी तारखा देणे शक्य नाही. काही निर्माते तारखा घेऊन चार-पाच दिवस अगोदर प्रयोग रद्द करतात. त्यामुळे नाट्यगृहाचे नुकसान होते. ५०० रुपये तिकिट केल्यास नियमानुसार भाडे वाढवले जाते. जास्त तिकिट घेतले जाणे ट्रस्टच्या दृष्टिने चूक आहे. प्रेक्षकांना भुर्दंड पडू नये यासाठी हा नियम आहे. तारखा वाटपासाठी सर्व निर्मात्यांना बोलावून विचार केला जाईल. सर्वसाधारण सभेत चर्चा करून आमची भूमिका स्पष्ट करू.

टॅग्स :मुंबई