मुंबई : काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून त्याऐवजी या नेत्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. सरकारने यासंदर्भात कायदा केला. परंतु, उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. त्यानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र, तेथे सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. तथापि, यासंदर्भात संवैधानिक कारवाई पूर्ण करण्यासाठी सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन केला. त्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत संवैधानिक प्रस्ताव तयार केला जात आहे. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने सरकार आपल्या अखत्यारितील बाबी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून ६०२ अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के शैक्षणिक शुल्काचा परतावा राज्य सरकार देत आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारत आहोत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण उद्योजकांना सुलभ कर्ज योजना आहे. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार करून तिला सर्व अधिकार दिले आहेत. यावरूनच राज्य सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट होते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
परिस्थिती चिघळविण्याचा काहींचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 5:17 AM