Join us

रेल्वे हेल्पलाइनवर कोणाला हवाय पिझ्झा, तर कोणाला समोसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:08 AM

मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने १८२ हेल्पलाइन सुरू केली आहे. मात्र, या हेल्पलाइनवर फोन करून काही जण एक समोसा ...

मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने १८२ हेल्पलाइन सुरू केली आहे. मात्र, या हेल्पलाइनवर फोन करून काही जण एक समोसा व पिझ्झाची ऑर्डर देत आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या हेल्पलाइन क्रमांकावर अशा प्रकारच्या ऑर्डर्सनी सध्या सुरक्षा दलाच्या जवानांना वैताग आणला आहे.

रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)च्या हेल्पलाइन क्रमांक १८२ची सुरुवात करण्यात आली होती. प्रवाशांना प्रवासात येणाऱ्या अडचणी, तसेच गुन्ह्यांबाबत आरपीएफकडे तक्रार करण्यासाठी या हेल्पलाइनची सुरुवात करण्यात आली, परंतु नागरिकांनी या हेल्पलाइन क्रमांकाला मस्करी करण्याचे साधन समजून त्याचा वापर सुरू केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर जवळपास ७० टक्के बनावट कॉल्स येत आहेत.

----------

मिळालेल्या माहितीनुसार आरपीएफच्या सुरक्षा हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून प्रवासी ज्या वस्तूंची मागणी करीत आहेत, त्यात मोबाइल रिचार्ज करणे, समोसा-पिझ्झा पोहोचविण्याची मागणी आदींचा समावेश आहे. यासोबतच ते बर्गर, चहा, ज्यूस, थंड पाण्याची मागणी करीत आहेत. काही प्रवासी तर वीजबिल जमा करणे, सिलिंडर कनेक्शनसाठी बुकिंग करणे किंवा रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी आरपीएफची मदत मागतात. पूर्वी ही संख्या अधिक होती. कोरोनामुळे रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे कॉलही कमी झाले आहेत. महिनाभरातील एकूण कॉलपैकी ७० टक्के कॉल्स बनावट असतात. आरपीएफचा हा हेल्पलाइन क्रमांक देशव्यापी आहे, परंतु बहुतांश वेळा त्यास आरपीएफ सुरक्षा क्रमांकाऐवजी प्रवासी त्याचा उपयोग रेल्वेतील चौकशीसाठी करीत आहेत. या हेल्पलाइन क्रमांकाचा मुख्य उद्देश काय आहे, हेच नागरिकांना माहीत नसल्यामुळे ते विनाकारण भलत्याच चौकशी करण्यासाठी याचा वापर करीत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

..............

७० टक्के कॉल्स बनावट

१८२ हा क्रमांक सुरक्षेसाठी आहे. मात्र, गेल्या वर्षभरात आलेल्या एकूण कॉल्सपैकी ७० टक्के कॉल्स सुरक्षेशिवाय कारणांसाठी आले आहे, पण आता लोकांमध्ये जागरूकता वाढली असून, पूर्वीपेक्षा हे कॉल्स कमी झाले आहेत, तसेच ऑटोमॅटिक डिव्हाइसद्वारे सुरक्षेशिवाय फोन असेल, तर तो ट्रान्सफर करण्यात येतो.

- जितेंद्र श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ

आरपीएफ हेल्पलाइनचे फायदे

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांसोबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना सुरक्षेची गरज भासते. अशा वेळी आरपीएफच्या हेल्पलाइन क्रमांक १८२ वर कॉल केला जाऊ शकतो. वैद्यकीय मदतीसाठी १३९ हेल्पलाइनवर कॉल करून १ नंबरचा पर्याय निवडावा लागतो. कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी २ नंबरचा पर्याय निवडण्यासाठी सांगण्यात येते.

महिना -सुरक्षेसाठी - सुरक्षेशिवाय इतर कारणांसाठी- एकूण

जानेवारी २४०१ - ७२९४-९६९५

फेब्रुवारी -२३८१-६५७९-८९६०

मार्च -१६००-६३९०-७९९०

एप्रिल -०-२८०६-२८०६

मे -०-०-०

जून -९०- २०३३-२१२३

जुलै -७७-१६४१-१७१८

ऑगस्ट -६४-१९०३-१९६७

सप्टेंबर -१००-१४१७-२५१७

ऑक्टोबर -१८६-२९३८-३१२४

नोव्हेंबर -२७२-३८३८-४११०

डिसेंबर -१९९-४२९४-४४९३

एकूण -७३७०-४२१३३-४९५०३